लंडन – कोरोनाव्हायरससारख्या भयंकर साथीची माहिती जगापासून दडवून ठेवणार्या चीनकडून सुमारे साडेसहा ट्रिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी साऱ्या जगाने एकजूट करावी, अशी मागणी ब्रिटनच्या ‘हेंरी जॅक्सन सोसायटी’ या अभ्यासगटाने केली आहे. ब्रिटनची माध्यमे आणि लोकप्रतिनिधी कोरोनाव्हायरस म्हणजे चीनचे जैविकशस्त्र असल्याचा आरोप करीत असून चीनच्या विरोधातील सूर आता अधिकाधिक आक्रमक बनू लागल्याचे दिसत आहे.
कोरोनाव्हायरसच्या साथीने आत्तापर्यंत जगभरात जवळपास ७० हजार जणांचे बळी घेतले आहेत. या साथीचा फैलाव पाहता पुढच्या काळातील बळींची संख्या याहून कितीतरी प्रमाणात वाढेल, अशी चिंता व्यक्त केली जाते. ही साथ रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवहार पूर्णपणे थंडावले आहेत. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे तब्बल साडेसहा ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. याला सर्वस्वी चीन जबाबदार आहे, असा ठपका ‘हेंरी जॅक्सन सोसायटी’ने ठेवला आहे.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातच चीनमध्ये कोरोनाव्हायरस २०० प्रकरणे समोर आली होती. तरीही चीनने ‘जागतिक आरोग्य संघटने’ला याबाबत अंधारातच ठेवले. आंतरराष्ट्रीय समुदाय व जागतिक आरोग्य संघटनेला यासाठीची माहिती उशिराने कळल्यामुळे पुढच्या काळात त्याचे भयंकर परिणाम सहन करावे लागले. पण चीन मात्र यासाथीबाबतची माहिती दडपण्याचा प्रयत्न करीत होता.
उलट यासाथीची माहिती देणाऱ्या ली वेन्लियांग यांच्यावरच चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने कारवाई केली. अशा देशाच्याविरोधात साऱ्या जगाने एकजूट करावी आणि चीनकडून तब्बल साडेसहा ट्रिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई वसूल करावी, असे आवाहन ‘हेंरी जॅक्सन सोसायटी’ने केले आहे
चीनकडून साडेसहा ट्रिलियन डॉलर्सची नुकसानभरपाईची मागणी म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेला भुईसपाट करण्यासारखेच ठरते. असे असले तरी या जागतिक संकटाला चीनच कारणीभूत आहे, असा ठपका ठेवून या देशाकडून फार मोठ्या नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे व त्याला दुजोराही मिळू लागला आहे.
या मागण्यांची तीव्रता वाढत चालली असून यामुळे चीनवरील दडपणही वाढत चालले आहे. सध्या चीन आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी धडपड करीत आहे. त्यासाठी चीन करीत असलेले प्रयत्न देखील या देशावरच उलटत असल्याचे दिसते आहे.