हॉंगकॉंग/बीजिंग/वॉशिंग्टन – जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या ६० लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४५ कोटींवर गेली असून चीन व दक्षिण कोरियात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेत रुग्णसंख्या व बळींच्या सरासरीत घट झाली असली, तरी साथीचा धोका पूर्ण संपला नसल्याचा इशारा आरोग्य यंत्रणेच्या नव्या अहवालाने दिला आहे. गेल्याच महिन्यात, कोरोना साथीची लवकर अखेर होण्याची शक्यता नसून याच्या नव्या लाटा येत राहतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्यतज्ज्ञांनी दिला होता.
दोन वर्षांपूर्वी चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना साथीचे संकट अद्यापही संपले नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा उगम असणार्या चीनमध्येच पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस चीनमध्ये दररोज २०० हून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. १ ते ८ मार्च या कालावधीत चीनमधील सरासरी रुग्णसंख्या दर ३००वर पोहोचला आहे. चीनमधील पाच प्रांत कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. त्यात जिलिन, ग्वांगडॉंग, शान्डॉंग, जिआंग्सु, गान्सु या प्रांतांचा समावेश आहे.
चीनमधील प्रांतांव्यतिरिक्त हॉंगकॉंग कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनल्याचे समोर येत आहे. २६ फेब्रुवारीपासून हॉंगकॉंगमध्ये सातत्याने २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. हॉंगकॉंगमधील दर आठवड्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ४० हजारांवर गेला आहे. गेले तीन दिवस हॉंगकॉंगमधील कोरोनाच्या बळींची संख्याही २००च्या वर नोंदविण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या अवधीत हॉंगकॉंगमध्ये पाच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
हॉंगकॉंगची लोकसंख्या ७५ लाखांहून कमी आहे. त्याचा विचार करता वाढती रुग्णसंख्या व बळींची संख्या स्थानिक प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरले आहे. चीनमध्ये ९० टक्क्यांहून अधिक लसीकरणाचा दावा करण्यात आला आहे, मात्र हॉंगकॉंगमध्ये ही टक्केवारी ६० टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. चीनच्या ‘झीरो कोविड’ धोरणाचा अवलंब करणार्या हॉंगकॉंग प्रशासनाने लसीकरण व इतर सुविधांकडे फारसे लक्ष पुरविले नसल्याची तक्रार हॉंगकॉंगमधील जनता करीत आहे.
चीन व हॉंगकॉंगबरोबरच दक्षिण कोरियातही कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसते. दक्षिण कोरियात गेले दोन आठवडे दररोज एक लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी ८ मार्च रोजी दक्षिण कोरियात तीन लाख, ४२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून हा कोरोना साथीच्या काळातील नवा रेकॉर्ड ठरला आहे. गेले सात दिवस दक्षिण कोरियात कोरोनाच्या बळींची सरासरीही १००वर गेली आहे. या वाढत्या आकडेवारीमागे ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग कारणीभूत असल्याचे स्थानिक यंत्रणा सांगत आहेत.