सिरियामधील रशियाच्या हवाई हल्ल्यांमध्ये 45 दहशतवादी ठार रशियासह अमेरिका, तुर्कीच्या लष्करी हालचाली वाढल्या

45 दहशतवादी ठारदमास्कस – सिरियाच्या इदलिब प्रांतात रशियाच्या लढाऊ विमानांनी केलेल्या कारवाईत 45 दहशतवादी ठार झाले. ‘जबात अल-नुस्र’ या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा हल्ला चढविल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. गेल्या दहा दिवसात रशियाने सिरियातील दहशतवाद्यांवर केलेला हा दुसरा मोठा हल्ला ठरतो. अमेरिका आणि तुर्कीने देखील सिरियातील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्याची माहिती समोर येत आहे. तर अमेरिका सिरियन जनतेवर हल्ला चढवून त्याचे खापर अस्साद राजवटीवर फोडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप रशियाने केला आहे.

गेले सहा महिने युक्रेनमध्ये गुंतलेल्या रशियाचे सिरियाकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा दावा केला जात होता. ही संधी साधून अमेरिका, तुर्कीने सिरियातील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्याचे सिरियन माध्यमांचे म्हणणे होते. अमेरिकेने सिरियाच्या पूर्वेकडील भागात नवा लष्करी तळ उभारल्याचा आरोपही सिरियन सूत्रांनी केला होता. याच काळात अल कायदा आणि आयएसशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनांचा सिरियाच्या उत्तरेकडील भागात प्रभाव वाढत असल्याचे इशारे स्थानिक मानवाधिकार संघटनांनी दिले होते. तशात ‘आयएस’नेे दहशतवादी असलेल्या तुरुंगावर हल्ला चढवून आपल्या शेकडो साथीदारांची सुटका केली होती.

45 दहशतवादी ठारमात्र गेल्या दहा दिवसांमध्ये रशिया पुन्हा एकदा सिरियात सक्रीय झाल्याचे दिसत आहे. 9 सप्टेंबर रोजी तुर्कीच्या सीमेला भिडलेल्या इदलिब प्रांतात रशियाच्या लढाऊ विमानांनी किमान 14 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात अल कायदासंलग्न ‘जबात अल-नुस्र’ गटाचे एकूण 120 दहशतवादी ठार झाले होते. यामध्ये 20हून अधिक कमांडर्सचा समावेश असल्याची माहिती रशियाने दिली होती. तर 17 सप्टेंबर रोजी रशियाच्या हवाईदलाने पुन्हा एकदा इदलिब प्रांतातील शेख युसूफ भागाला लक्ष्य केले. यामध्ये 45 दहशतवादी मारले गेल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल ओलेग इगोरोव्ह यांनी दिली.

तसेच सिरियातील अस्थैर्याचा फायदा घेऊन अमेरिका सिरियामध्ये ‘फॉल्स-फ्लॅग’ अर्थात खोटे दहशतवादी हल्ले घडविल, असा गंभीर आरोप मेजर जनरल इगोरोव्ह यांनी केला. अमेरिका समर्थक दहशतवादी सिरियाच्या अल-तन्फ या ठिकाणी सिरियन जनतेला लक्ष्य करणारे हल्ले घडवून आणू शकते. इराक आणि जॉर्डनच्या सीमेजवळील या प्रांतात होणाऱ्या हल्ल्यांचे खापर अमेरिका सिरियातील अस्साद राजवट आणि लष्करावर फोडेल, असा ठपका मेजर जनरल इगोरोव्ह यांनी ठेवला. यासाठी अमेरिका सिरियातील ‘मघावेर अल-थावरा’ या दहशतवादी गटाचे सहाय्य घेईल, असा दावा रशियाने केला.

रशिया हे आरोप करीत असतानाच, काही तासांपूर्वी सिरियाच्या देर अल-झोर प्रांतातील अमेरिकेच्या लष्करी तळाजवळ अयशस्वी रॉकेट हल्ला झाल्याचे ‘सेंटकॉम’ने स्पष्ट केले. तर तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील कुर्द तसेच सिरियन लष्कराच्या चौक्यांवर हल्ले चढविले आहेत. यामध्ये तिघांचा बळी गेल्याची माहिती सिरियन वृत्तसंस्थेने दिली आहे.

leave a reply