अफगाणिस्तानच्या हवाई हल्ल्यात तालिबानचे सहा दहशतवादी ठार

काबूल – अफगाणिस्तानच्या जवझान प्रांतातील अक्वाचा जिल्ह्यात सुरक्षादलांनी चढविलेल्या हवाई हल्ल्यात तालिबानचे सहा दहशतवादी ठार झाले आहेत. याच्या एक दिवस आधीच सुरक्षा दलांनी जवझान प्रांतात हवाई हल्ला चढवून २१ तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले होते. तसेच शनिवारी अफगाणिस्तानच्या कुंदुझ प्रांतात अफगाणी सुरक्षा दलाने तालिबानच्या कमांडरला ठार केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अफगाणिस्तानच्या २०९ शहीन कॉर्प्सने जवझान प्रांतात हवाई हल्ला चढविला. यात तालिबानचे सहा दहशतवादी ठार झाले. याचे अधिक तपशील प्रसिद्ध झाले नाहीत. पण अफगाणिस्तानच्या माध्यमांमध्ये या हवाई हल्ल्याचे फोटोग्राफ्स आले आहेत. तर गुरुवारी याच प्रांतात अफगाणी सुरक्षा दलाने चढविलेल्या हवाई हल्ल्यात २१ तालिबानी दहशतवादी ठार झाले होते. यात तालिबानच्या तीन कमांडर्सचा समावेश होता.

शनिवारी अफगाणिस्तानच्या कुंदुझ प्रांतात अफगाणी सुरक्षा दलाच्या हल्ल्यात तालिबान कमांडर ‘हबिबुल्लाह हसिन’ ठार झाला. याचा अफगाणिस्तानच्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये समावेश होता.

दरम्यान, अमेरिका आणि तालिबानमध्ये शांती करार झाल्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच आहेत. दोनच दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने केलेल्या हल्ल्यात १४ जणांचा बळी गेला होता. तर गेल्या महिन्याभरात तालिबानने अफगाणिस्तानमध्ये चढविलेल्या हल्ल्यात १४६ जणांचा बळी गेला आहे. अफगाणिस्तानच्या ‘नँशनल सिक्युरिटी कौन्सिल’ने ही माहिती जाहीर केली.

अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या तयारीत असताना तालिबानने अफगाणी सुरक्षा दलांवरील वाढविलेले हल्ले म्हणजे अफगाणिस्तानातील सत्ता काबीज करण्याची तयारी असल्याचा दावा केला जातो. पुढच्या काही महिन्यांमध्ये तालिबान अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करील, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. यासाठी तालिबानने दहशतवादी हल्ल्याचे भीषण सत्र सुरू केल्याची जाणीव अफगाणी सरकार व सुरक्षायंत्रणाना ही झालेली आहे. म्हणूनच तालिबानच्या दहशतवादी हल्ल्यांना अफगाणी सरकार व सुरक्षा यंत्रणांकडून हवाई हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर दिले जात आहे. यामुळे अमेरिका व तालिबान मधील शांती करारानंतर अफगाणिस्तानात शांतता नांदेल ही आशा निकालात निघाली असून येत्या काही दिवसात अफगाणिस्तानातील संघर्ष अधिक रक्तरंजित बनणार असल्याचे दिसत आहे.

leave a reply