अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतरही अमेरिकेला दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवू

- राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे आश्‍वासन

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार, अमेरिकेला असुरक्षित बनविणारी ठरेल. या सैन्यमाघारीमुळे तालिबान व अल कायदा अफगाणिस्तानचा ताबा घेतील आणि अमेरिकेवर नव्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखतील, असा इशारा अमेरिकन लोकप्रतिनिधी, गुप्तचर विभागाचे व लष्कराचे आजीमाजी अधिकारी देत आहेत. माजी परराष्ट्रमंत्र्यांनीही अफगाणिस्तानच्या सैन्यमाघारीचे अमेरिकेच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील, असे बजावले आहे. मात्र अमेरिका दहशतवादी हल्ला होण्याच्या आधीच रोखून आपल्या जनतेला सुरक्षित राखण्याच्या आघाडीवर अजिबात चालढकल करणार नाही, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली आहे.

१ मे २०११ रोजी पाकिस्तानच्या ऍबोटाबाद शहरात घुसून अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार केले होते. त्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. लादेनला संपविणारी मोहीम अमेरिकेने आखली त्यावेळी, ज्यो बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते. लादेनला संपविण्याची मोहीम राबविणार्‍या नॅशनल सिक्युरिटी टीमच्या सिच्युएशन रूममध्ये आपणही होतो, याच्या आठवणींना बायडेन यांनी उजाळा दिला. लादेनला ठार करून अमेरिकेने ९/११ हल्ल्यातील बळींना न्याय मिळवून देण्याचे वचन अमेरिकेने पूर्ण केले. पुढच्या काळातही दहशतवादी हल्ला होण्याच्या आधीच तो रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये व अमेरिकेला सुरक्षित राखण्याच्या चालढकल केली जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे.

१ मे पासूनच अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्याच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या अफगाणिस्तानात अमेरिकेचे २५०० ते ३५०० सैनिक तर नाटोचे सात हजार सैनिक अफगाणिस्तानात तैनात आहेत. ११ सप्टेंबरपर्यंत अमेरिका व नाटोचे सैनिक अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेणार असल्याची घोषणा करण्यात आली?आहे. या सैन्यमाघारीच्या घोषणावर अमेरिकेत टीका होत आहे. अमेरिकेचे लोकप्रतिनिधी, गुप्तचर विभागाचे व लष्कराचे आजी-माजी अधिकारी आणि मुत्सद्दी देखील या निर्णयाला विरोध करीत आहेत. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबान व अल कायदाच्या ताब्यात जाईल. त्यानंतर अमेरिकेवर नव्या दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान आखले जाईल. याने अमेरिका असुरक्षित बनेल, असा इशारा माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस व हिलरी क्लिंटन यांनी दिला आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांना अमेरिकेच्या सुरक्षेबाबत आश्‍वस्त करावे लागत असल्याचे दिसते. मात्र हे आश्‍वासन देत असताना, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी लक्षवेधी विधान केले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिका माघार घेत असली तरी आपल्या सहकारी व भागीदार देशांच्या सहाय्याने दहशतवाद्यांपासून असलेल्या धोक्याविरोधात, अमेरिका आणि अमेरिकेचे हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी आवश्यक त्या कारवाया करू, असा दावा बायडेन यांनी केला आहे. अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेऊन अमेरिका हे सैन्य पाकिस्तानात तैनात करील आणि त्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकडे लष्करी तळांची मागणी केलेली आहे. यासंदर्भातील बातम्या पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विधानातून या बातम्यांना दुजोरा मिळत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान?खान यांनी आपल्यावर फार मोठे दडपण असल्याचे म्हटले होते. हे दडपण कुणाकडून येत आहे, याबाबत माध्यमे व विश्‍लेषक निरनिराळे दावे करीत आहेत. मात्र काही पत्रकारांनी पंतप्रधान इम्रान?खान यांच्यावर अमेरिकेला लष्करी तळ देण्यासाठी दडपण येत असल्याची माहिती दिली. हा निर्णय?घेतला तर पाकिस्तानात त्याचे फार मोठे पडसाद उमटू शकतात. यामुळे तालिबान पाकिस्तानवर उलटू शकते आणि यामुळे पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याचे भयंकर सत्र सुरू होऊ शकते. याबरोबरच चीन, इराण या देशांचा विरोध पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो. मात्र अमेरिकेला तळ नाकारल्यास त्याचे भयंकर आर्थिक परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. सध्या बायडेन यांच्या प्रशासनाने पाकिस्तानवरील दडपण वाढवून या परिणामांची चुणूक दाखविल्याचे समोर येत आहे. यामुळे पाकिस्तानच्या सरकारची कोंडी झाली आहे.

म्हणूनच तालिबानच्या मागणीनुसार मेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेत असली, तरी अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ले चढविण्याची आपली क्षमता कमी होणार नाही, याची दक्षता अमेरिकेकडून घेतली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. अत्याधुनिक ड्रोन्स तसेच लढाऊ विमाने आणि इतर अद्ययावत शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य असताना, अमेरिकेला अफगाणिस्तानात सैनिक तैनात ठेवण्याची आवश्यकता नाही. उलट यावरील खर्च कमी करून अमेरिका अफगाणिस्तानातील आपले हेतू सहजपणे साध्य करू शकेल, असा तर्क या सैन्यमाघारीच्या निमित्ताने मांडला जात आहे. मात्र त्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानात लष्करी तळ उभारावा लागेल. हा तळ अमेरिकेला द्यायचा की नाही, हा पाकिस्तानसाठी जीवनमरणाचा प्रश्‍न बनल्याचे दिसत आहे.

leave a reply