अणुकरारात सामील होण्याची जबाबदारी अमेरिकेवर आहे

- इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ

अणुकरारात सामीलतेहरान – ‘अणुकरारातील नियमांचे पालन करायचे की यापुढेही बेकायदेशीर वर्तन ठेवायचे, हे आज अमेरिकेला ठरवावेच लागेल. अणुकरारात सामील होण्याची जबाबदारी अमेरिकेवर आहे, इराणवर नाही’, अशा परखड शब्दात इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी बायडेन प्रशासनाला धमकावले. अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व निर्बंध मागे घ्यावे, अशी इराणची प्रमुख मागणी आहे. पण इराणबरोबर अणुकरारासाठी उत्सुक असलेले बायडेन प्रशासन इराणची ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बायडेन प्रशासनाला इशारा दिल्याचे दिसत आहे.

२०१८ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतली होती. २०१५ साली पाश्‍चिमात्य देशांनी केलेल्या अणुकराराचे उल्लंघन करून इराण अण्वस्त्रनिर्मिती करीत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर कठोर आर्थिक व व्यापारी निर्बंध लादले होते. पण तीन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या सत्तेवर आलेल्या बायडेन प्रशासनाने इराणबरोबरचा अणुकरार पुनरूज्जीवित करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

अणुकरारात सामीलयासाठी व्हिएन्ना येथे गेल्या तीन आठवड्यांपासून युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने अमेरिका व इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये इराणने आपल्या अणुकार्यक्रमातील युरेनियमची वाढविलेले संवर्धन आणि सेंट्रिफ्यूजेसची संख्या कमी करावी, अशी मागणी बायडेन प्रशासन करीत आहे. आपली ही मागणी मान्य केल्यास इराणवरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले जातील, असा प्रस्ताव बायडेन प्रशासनाने दिला आहे. पण इराणला हा प्रस्ताव अजिबात पटलेला नाही.

इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी शनिवारी सोशल मीडियाद्वारे बायडेन प्रशासनाच्या प्रस्तावावरील नाराजी व्यक्त केली. ‘व्हिएन्ना येथील वाटाघाटीतून २०१५ सालचा अणुकरार पुनरूज्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, हे सर्व कसे सुरू झाले ते लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या मूर्ख माणसाने अणुकरारातील अमेरिकेच्या नियमांचे उल्लंघन केले. तेव्हा यापुढे अणुकरारातील नियमांचे पालन करायचे की बेकायदेशीर वर्तन ठेवायचे, याचा निर्णय आज अमेरिकेला घ्यावाच लागेल. कारण अणुकरारात सामील होण्याची जबाबदारी इराणवर नाही तर अमेरिकेवरही आहे’, असे झरिफ यांनी खडसावले.

ट्रम्प प्रशासनाने गेल्या तीन वर्षांमध्ये इराणवर लादलेले सर्व निर्बंध बायडेन प्रशासनाने तातडीन मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी इराण करीत आहे. त्याचबरोबर २०१५ सालच्या अणुकरारात कुठलाही बदल करू नये, असे इराणने स्पष्ट केले आहे. बायडेन प्रशासन इराणबरोबरच्या अणुकरारासाठी उत्सूक आहेत. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेले सर्व निर्बंध पूर्णपणे काढणे बायडेन प्रशासनाला शक्य नसल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात इस्रायलच्या सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अमेरिकेचा विशेष दौरा केला होता. या दौर्‍यात इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख योसी कोहेन यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतली होती. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत इस्रायलची भूमिका स्पष्टपणे मांडली होती.

leave a reply