नायजेरियातील दहशतवादी संघटना ‘बोको हराम’चा प्रमुख ठार झाल्याचा दावा – ‘आयएस’ने हल्ला केल्याचा संशय

अबुजा – नायजेरियातील दहशतवादी संघटना ‘बोको हराम’चा प्रमुख अबुबाकर शेकाऊ ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिकेतील ‘आयएस’संलग्न दहशतवादी संघटनेने ‘बोको हराम’च्या तळावर जोरदार हल्ला चढविला होता. त्यात जबर जखमी झालेला शेकाऊ दगावल्याचे वृत्त अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने दिले आहे. शेकाऊचा मृत्यू झाला असल्यास ही गोष्ट आफ्रिकेतील दहशतवादविरोधी मोहिमेसाठी सकारात्मक घटना ठरते, अशी प्रतिक्रिया अमेरिकी अधिकार्‍यांनी दिली आहे.

दहशतवादी संघटनाआफ्रिकेतील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना म्हणून ‘बोको हराम’ ओळखण्यात येते. नायजेरिया, नायजर, चाड व कॅमेरून या देशांमध्ये या संघटनेचे जाळे पसरले आहे. नायजेरियाचा ईशान्य भाग व चाड लेकचा भाग या भागावर या दहशतवादी संघटनेचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. अल कायदा संलग्न गट म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘बोको हराम’ने गेल्या काही वर्षात आपली वेगळी ओळख तयार केली होती. या संघटनेतील काही सदस्य ‘आयएस’मध्ये सहभागी झाल्याचेही सांगण्यात येते.

गेल्या दशकभरात बोको हरामने चढविलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 10 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. नायजेरियातील लाखो नागरिकांना यामुळे विस्थापित व्हावे लागले आहे. काही वर्षांपूर्वी शेकडो विद्यार्थिनींचे अपहरण करण्याच्या घटनेने ही संघटना प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

दहशतवादी संघटनानायजेरिया व इतर देशांनी बोको हरामविरोधात वारंवार व्यापक लष्करी मोहिमा राबविल्याचा दावा केला आहे. मात्र त्यानंतरही या संघटनेचा बिमोड करणे आफ्रिकी देशांना शक्य झालेले नाही. नायजेरियाच्या लष्कराने अनेकदा बोको हरामचा प्रमुख शेकाऊला मारल्याचे दावेही केले होते. मात्र त्यानंतरही तो जिवंत असल्याचे समोर आले होते.

या सर्व पार्श्‍वभूमीवर अबुबाकर शेकाऊचा मृत्यू लक्ष वेधून घेणारी घटना ठरली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर नायजेरियातील ‘संबिसा फॉरेस्ट’ भागात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी बोको हरामच्या तळावर हल्ला चढविला. हल्ल्यादरम्यान आयएसकडून शेकाऊला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पकडले जाऊ नये म्हणून त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे सांगण्यात येते. यात जबर जखमी झालेल्या शेकाऊचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. नायजेरियाच्या यंत्रणांनी याबाबत अद्याप ठोस ग्वाही दिलेली नाही.

दहशतवादी संघटनामात्र अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ ने शेकाऊचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. आफ्रिकेतील विविध अधिकारी, गुप्तचर यंत्रणा व या यंत्रणांनी टॅप केलेले संभाषण यांच्या हवाल्यावरून हा दावा करीत असल्याचे दैनिकाच्या वृत्तात सांगण्यात आले आहे. यात शेकाऊने स्वतःला बांधलेल्या बॉम्बचा स्फोट घडविल्याचेही म्हंटले आहे.

दरम्यान, शुक्रवारी नायजेरियाच्या कदुना विमानतळानजिक झालेल्या एका अपघातात देशाचे लष्करप्रमुख इब्राहिम अताहिरु यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह लष्करी विमानातून प्रवास करणार्‍या इतर 10 जणांचाही बळी गेल्याचे लष्करी प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. खराब हवामानामुळे विमान अपघात झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. अताहिरु यांनी जानेवारी महिन्यात लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली होती.

leave a reply