अमेरिका व दक्षिण कोरियाच्या सहकार्यावर चीनच्या मुखपत्राची टीका

वॉशिंग्टन – गेल्या चार दशकांपासून दक्षिण कोरियावर लादलेले मिसाईल गाइडलाईन्स अर्थात क्षेपणास्त्रांवरील बंधने मागे घेण्याची घोषणा अमेरिकेने केली. यामुळे दक्षिण कोरिया आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करू शकेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांच्या भेटीत ही घोषणा झाली. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ‘सेमीकंडक्टर’च्या निर्मितीबाबत सहकार्याची घोषणा झाली आहे. अमेरिका व दक्षिण कोरियातील या सहकार्यावर चीनच्या सरकारी मुखपत्राने संताप व्यक्त केला.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी अमेरिकेचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतली. अमेरिकेबरोबर संरक्षण, तंत्रज्ञानविषयक तसेच वैद्यकीय आघाडीवरील सहकार्य वाढविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मून यांचा हा दौरा होता. दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर टाकलेल्या मर्यादा मागे घेण्याचे जाहीर केले.

अमेरिका व दक्षिण कोरियाच्या सहकार्यावर चीनच्या मुखपत्राची टीका1979 साली या दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार, दक्षिण कोरियाने आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 180 किलोमीटर पर्यंत मर्यादित ठेवणे मान्य केले होते. या मोबदल्यात दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून लष्करी तंत्रज्ञान मिळविले होते. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा धोका अधोरेखित करून दक्षिण कोरियन क्षेपणास्त्रांची मारक क्षमता चार पटीने वाढविण्याची अर्थात 800 किलोमीटरपर्यंत नेण्याची मूभा दिली होती.

पण शुक्रवारच्या निर्णयामुळे दक्षिण कोरिया आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तसेच पाणबुडीतून प्रक्षेपित करता येणार्‍या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करू शकतो. हा निर्णय दक्षिण कोरियाला बेड्यांमधून मुक्त करणारा आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे सर्वाधिकार बहाल करणारा ठरतो, असा दावा लष्करी विश्‍लेषक करीत आहेत. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमुळे, उत्तर कोरिया व इतर धोक्यांपासून दक्षिण कोरियाला सामरिक सुरक्षा मिळेल, असे या लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

तर अमेरिका व दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या आघाडीवर विशेष सहकार्यावर एकमत जाले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या असणार्‍या सेमीकंडक्टरच्या निर्मितीबाबत सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. काही महिन्यांपूर्वी सेमीकंडक्टर्सच्या कमतरतेमुळे फोर्ड आणि जनरल मोटर्स या वाहननिर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना आपले काही कारखाने बंद करावे लागले होते. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष मून यांनी प्रस्थापित केलेल्या सहकार्यामुळे अमेरिकन उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक सेमीकंडक्टर्सच्या पुरवठ्यासाठी दक्षिण कोरियाकडून मोठे सहाय्य मिळणार असल्याचा दावा केला जातो.

सेमीकंडक्टर्सच्या आघाडीवर अमेरिका आणि दक्षिण कोरियात झालेल्या या सहकार्यावर न्यूयॉर्क टाईम्स तसेच चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने टीका केली आहे. अमेरिकन उद्योगक्षेत्राला हव्या असलेल्या सेमीकंडक्टर्सची मागणी पूर्ण करण्यासाठी दक्षिण कोरिया हा चीनला पर्याय ठरू शकणार नाही, असे अमेरिकी वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

तर सेमीकंडक्टर्सच्या आघाडीवर दक्षिण कोरियाशी सहकार्य करून अमेरिका चीन व दक्षिण कोरियामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका चिनी मुखपत्राने केली. तरीही चीन व दक्षिण कोरियातील सहकार्यावर याचा प्रभाव पडणार नाही, असा दावा चीनच्या मुखपत्राने केला.

राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष मून यांच्यातील चर्चेत ईस्ट व साऊथ चायना सी तसेच तैवानवरही चर्चा पार पडली. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. तर व्हाईट हाऊसने देखील आपल्या निवेदनात तैवानचा मुद्दा प्रसिद्ध केला. तैवानच्या आखातातील शांतता व स्थैर्य जतन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. लोकशाहीवादी देश म्हणून मानवाधिकार आणि कायद्यांच्या सुरक्षेसाठी उभय देशांना ही जबाबदारी पार पाडावी लागेल, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या क्षेत्रातील स्थैर्याचा विचार केल्यामुळे तैवानने दोन्ही देशांची आभार व्यक्त केले. पण यामुळे चीनची अस्वस्थता वाढली आहे. अमेरिका व दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांच्या चर्चेत तैवानचा झालेला उल्लेख चिंताजनक असल्याचे चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. पण आपल्या पूर्ण निवेदनात दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी चीनचा उल्लेख टाळला याकडे चीनच्या मुखपत्राने लक्ष वेधले.

leave a reply