दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांना १९९३ सारखी बॉम्बस्फोट मालिका घडवायची होती

बॉम्बस्फोटनवी दिल्ली – १९९३ साली मुंबईत घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रमाणे देशात एकाचवेळी ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचे कारस्थान दहशतवाद्यांनी आखले होते, अशी माहिती समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी ओसामा नावाच्या दहशतवाद्याचे वडील उसैदूर रहमान आणि त्याचा काका उमैदूरही या कटात सहभागी असून ते फरार आहेत. आखाती देशात राहणार्‍या उसैदूर रहमानला पाकिस्तानच्या आयएसआयच्या कर्नल गाझीकडून सूचना मिळत होत्या, अशी माहितीही तपासात उघड झाली असून उसैदूर रहमानसाठी लूक आऊट नोटीस बजाविण्यात आली आहे, असे सांगण्यात येते. त्याचवेळी पंजाबमध्ये बुधवारी चार दहशतवाद्यांना पकडण्यात आले असून पंजाब सरकारने यानंतर राज्यात अतिदक्षेतेचा इशारा दिला आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत निरनिराळे खुलासे होत आहेत. यामध्ये दिल्लीतील जामिया नगर भागातून अटक करण्यात आलेल्या ओसामा या दहशतवाद्यांच्या वडीलांचे व अलाहाबादमध्ये राहणार्‍या त्याच्या काकाचेही नाव समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी ओसामा आणि झिशान कमर नावाच्या दहशतवाद्याने पाकिस्तानात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले होते. यातील झिशानला ओसमाचा काका उमैदूर उर रहमान यांनेही दिशाभूल करून त्याला दहशतवादी बनण्यासाठी तयार केले होते. उमैदूर हा ओसामा आणि झिशानच्या नियमित संपर्कात होता. ओसामाचे वडील उसैदूर उर रहमानने आखाती देशातून या संपूर्ण कट तडीस नेण्यास पैसे पाठविले होते. त्यामुळे या दोघांचा शोध सुरू आहे.

उसैदूर हा गेली काही वर्ष आखातात राहून काम करीत आहे. तो आयएसआय हस्तकाच्या संपर्कात होता. आयएसआयचा कर्नल गाझी नावाच्या अधिकार्‍याकडून त्याला सूचना मिळत होत्या. या कर्नल गाझीच्या आदेशावर पाकिस्तानचे आणखी दोन अधिकारी सतत उसैदूरच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळत आहे. दुबईतून काही पैशाचा व्यवहार झाल्याचेही तपासात समोर आल्याने आता उसैदूरला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उसैदूर आणि उमैदूर विरोधात लूक आऊट नोटीस बजाविण्यात आली आहे. ओसामा आणि झिशानला मस्कतवरून पाकिस्तानात नेण्यात आले. यासाठी इराण मार्गाचा वापर करण्यात आला. मस्कतवरून समुद्र मार्गाने एका बोटीवरून त्यांनी इराण गाठले. तेथून काही प्रवास रस्ते मार्गाने केल्यावर पुन्हा समुद्र मार्गे ग्वादर बंदरात या दोघांना आणण्यात आले व तेथून जिवानी या शहरात आणून थट्टा येथील फार्महाऊसवर आणण्यात आले. येथेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यात सामील दहशतवाद्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले होते.

पाकिस्तानने भारतात आखलेला हा दहशतवादी कट उघड झाल्यानंतर पाकिस्तानातही अस्वस्थता दिसून येत आहे. दहशतवादाला पोसणार देश म्हणून भारत जागतिक पातळीवर पाकिस्तानवर दबाव वाढवित आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानात तालिबानच्या खुल्या समर्थनावरून पाकिस्तानची अंतरराष्ट्रीत प्रतिमा आणखी खराब झाली असताना भारतातील या दहशतवादी कटाच्या बातम्या आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने भारतीय माध्यामातून टेरर मॉड्यूलबद्दल करण्यात येणारे दोषारोप निराधार असल्याची बतावणी केली आहे.

दरम्यान, बुधवारी पंजाबमध्ये आणखी?एक दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आले. एक ऑईल टँकर या दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. आयईडीचा स्फोट घडवून हा ऑईल टँकर उडवून मोठी जीवितहानी करण्याची दहशतवाद्यांची योजना होती. पोलिसांनी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह चार जणांना अटक केली असून टीफीन बॉम्बही जप्त केला आहे. गेल्या ४० दिवसात पंजाबमध्ये हे चौथे पाकिस्तानी टेरर मॉड्यूल नष्ट करण्यात आले आहे.

leave a reply