मॉस्को/वॉशिंग्टन – युक्रेनवर हल्ले चढवून रशियाने जगभरातील लाखोजणांना अन्नधान्यापासून वंचित केले आहे. रशिया अन्नाचा शस्त्रासारखा वापर करीत असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. मात्र अमेरिकाच युक्रेनमधील अन्नधान्याच्या साठ्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप रशियाने केला. अमेरिकेच्या या कारवाईमुळे जगभरात अन्नटंचाई निर्माण होऊन भीषण दुष्काळ पसरेल, असा इशारा रशियाने दिला.
रशिया-युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन जवळपास तीन महिने लोटले आहे. हे दोन्ही देश गहू आणि इतर अन्नधान्याचे मोठे उत्पादक तसेच निर्यातदार म्हणून ओळखले जातात. आफ्रिकी, आखाती तसेच युरोपिय देश रशिया व युक्रेनमधून निर्यात होणाऱ्या गहू व अन्नधान्यावर अवलंबून होते. पण युद्ध भडकल्यामुळे या देशांची जबर कोंडी झाली आहे. जगभरातील गव्हाच्या किंमती कडाडल्याची चिंता व्यक्त केली जाते.
येत्या काळात युक्रेन युद्धावर तोडगा शोधला नाही, तर काही देशांमध्ये दीर्घकालिन दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांनी दिला. यामध्ये आफ्रिकेतील देशांचा मोठ्या प्रमाणात समावेश असेल, अशी चिंता संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिवांनी न्यूयॉर्कमधील बैठकीत व्यक्त केली. याच बैठकीत सहभागी झालेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी जागतिक दुष्काळासाठी रशिया जबाबदार असेल, असा ठपका ठेवला.
रशियाने ब्लॅक सी आणि ॲझोव्हच्या समुद्राची कोंडी केल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. या सागरी क्षेत्राजवळच्या युक्रेनच्या कोठारात जवळपास दोन कोटी टन अन्नधान्याचा साठा अडकून पडल्याचा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केला. रशिया या अन्नधान्याचा शस्त्रासारखा वापर करीत असल्याचे टीकास्त्र ब्लिंकन यांनी सोडले.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सल्लागार मक्सिन ओरेश्कीन यांनी ब्लिंकन यांच्या आरोपांना उत्तर देताना, अमेरिकाच युक्रेनच्या अन्नधान्यावर डोळा ठेवून असल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या नियंत्रणातील अन्नधान्याचा साठा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे. असे झाले तर भीषण मानवी संकट उभे राहील, याची जाणीव ओरेश्कीन करुन देत आहेत. अमेरिकेच्या या मतलबीपणामुळे येत्या काही महिन्यांमध्ये जगाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागेल, असा अत्यंत गंभीर इशारा ओरेश्कीन यांनी दिला आहे.