ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस चार दिवसांच्या भारतभेटीवर आले आहेत. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली. ऑस्ट्रेलियात नुकतेच सत्तेवर आलेल्या पंतप्रधान अँथनी अल्बानीज्‌‍ यांच्या सरकारला भारताबरोबरील सहकार्य अधिकच दृढ करायचे आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या हितासाठी ऑस्ट्रेलिया भारताशी घनिष्ठ सहकार्य प्रस्थापित करील, असे संरक्षणमंत्री मार्लेस यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांच्या विरोधात चीनच्या वर्चस्ववादी कारवायांमध्ये वाढ झालेली असताना, ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात स्वीकारलेली ही भूमिका भारतासाठी महत्त्वाची ठरते.

visit-to-Indiaगोवा राज्यापासून आपल्या भारतभेटीची सुरूवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी आयएनएस हंसा या नौदलाच्या तळाला तसेच गोवा शिपयार्डला भेट दिली. त्यानंतर नवी दिल्ली येथे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी मार्लेस यांची चर्चा पार पडली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांची बुधवारी द्विपक्षीय चर्चा पार पडेल. या चर्चेसाठी आपण अतिशय उत्सूक असल्याची प्रतिक्रिया संरक्षणमंत्री मार्लेस यांनी दिली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने संरक्षणमंत्री मार्लेस यांनी योगासनाद्वारे आपण आजच्या दिवसाची सुरूवात केल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली.

गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री जपानच्या भेटीवर गेले होते. यावेळी संरक्षणमंत्री मार्लेस व जपानचे संरक्षणमंत्री नबुआ किशी यांच्यात उभय देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य अधिकच व्यापक करण्याचा निर्णयझाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताला दिलेली ही भेट, ऑस्ट्रेलियाचा प्राधान्यक्रम स्पष्ट करीत आहे. चीनपासून फार मोठा धोका संभवत असताना, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांची एकजूट करून चीनविरोधात सहकार्य वाढविण्याचेधोरण ऑस्ट्रेलियाने स्वीकारलेले आहे. हे सहकार्य केवळ संरक्षण किंवा सामरिक पातळीवर नसून आर्थिक सहकार्य व्यापक करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने वेगाने पावले उचलली आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताबरोबर मुक्त व्यापारी करार केलेला आहे.

पुढच्या काळात हे सहकार्य अधिकाधिक व्यापक करण्याचे आक्रमक डावपेच ऑस्ट्रेलियाने आखले असून भारताकडूनही त्याला तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.

leave a reply