भारत व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली – भारत हा या क्षेत्रातील अमेरिकेच्या धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. भारताच्या संरक्षणमंत्र्यांबरोबरील द्विपक्षीय चर्चेत संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी ही बाब अधोरेखित केली. तसेच भारत व अमेरिका या दोन मोठ्या लोकशाहींमधील सहकार्य स्वतंत्र आणि खुल्या इंडो-पॅसिफिकसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे युद्धात रुपांतर होणार नाही, याची आपल्याला खात्री होती, असे सूचक विधान अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी केले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा पार पडली. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशीही संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांची चर्चा झाली आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानांची भेट घेतली होती. भारताबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य अधिक व्यापक व भक्कम करणे हा आपल्या दौर्‍याचा हेतू असल्याचे संरक्षणमंत्री ऑस्टिन म्हणाले होते. राजनाथ सिंग यांच्याबरोबरील चर्चेनंतर आपली ही भेट फलदायी ठरली, असा दावा संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी केला आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतचे भारत व अमेरिकेचे सहकार्य या क्षेत्राच्या सुरक्षा व स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचा निर्वाळाही यावेळी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आव्हानांसाठी भारताला आवश्यक असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान व सहकार्य पुरविण्यास अमेरिका तयार असल्याचे यावेळी संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी म्हटले आहे. तसेच गोपनीय माहितीची देवाणघेवाण, रसद व साहित्याचा पुरवठा, आर्टिफिशल इंटेलिजन्स याच्याबरोबरच अवकाश व सायबर या नव्या आघाड्यांवर अमेरिका भारताशी सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. तर भारत व अमेरिकेमध्ये ‘लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरंडम ऑफ आर्टिकल-लिमोआ’, ‘कम्युनिकेशन्स कॉम्प्यॅटॅबिलटी अँड सिक्युरिटी अ‍ॅग्रीमेंट-कॉमकासा’ आणि ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट-बेका’ हे अत्यंत महत्त्वपूर्ण करार संपन्न झाले आहेत. या करारांचे दोन्ही देशांना पूर्णपणे लाभ मिळावा, यावर चर्चा पार पडल्याची माहिती यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. भारत व अमेरिकेमधील भागीदारी २१ व्या शतकाचे भवितव्य निर्धारित करणार असल्याचे सांगून ही भागीदारी अधिकाधिक भक्कम करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, अशी ग्वाही यावेळी भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, लडाखच्या एलएसीवर भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावावरही यावेळी चर्चा झाल्याचे सांगितले जाते. भारत आणि चीनमधील हा तणाव युद्धापर्यंत पोहोचणार नाही, याची आपल्याला खात्री होती, असे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र हा तणाव सुरू झाला त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व चीनमधील परिस्थिती भयावह असल्याचे सांगून इथे कुठल्याही क्षणी युद्ध पेट घेईल, अशी शक्यता असल्याची चिंता व्यक्त केली होती. तसेच या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचा प्रस्तावही ट्रम्प यांनी त्यावेळी दिला होता.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन आपल्या भारतभेटीद्वारे चीनला संदेश देत असल्याचे दावे माध्यमांकडून केले जात आहेत. तर बायडेन प्रशासनाची चीन तसेच भारताबाबतची भूमिका अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेली नसल्याची जाणीव काही विश्‍लेषक करून देत आहेत. सध्या तरी चीनला अनुकूल असलेली भूमिका उघडपणे स्वीकारणे बायडेन प्रशासनासाठी राजकीय घोडचूक ठरू शकते. पण पुढच्या काळात बायडेन प्रशासन चीनच्या विरोधात स्वीकारलेल्या आत्ताच्या भूमिकेवर?ठाम राहून आक्रमक निर्णय घेऊ शकेल का, याकडे भारताने अत्यंत गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचा दावा काही विश्‍लेषकांकडून केला जात आहे.

leave a reply