भारत व अमेरिकेचा ‘सीईओ फोरम’ आर्थिक सहकार्य भक्कम करील

- व्यापारमंत्री पियूष गोयल यांचा दावा

आर्थिक सहकार्यनवी दिल्ली – अमेरिकेच्या व्यापारमंत्री गिना रायमाँडो भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकन उद्योगक्षेत्रातील सीईओज्‌‍चे शिष्टमंडळ देखील भारतात दाखल झाले. त्यांची भारतीय उद्योगक्षेत्रातील मान्यवरांसोबत संयुक्त बैठक पार पडली. यावेळी बोलताना व्यापार व उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी ‘इंडिया-युएस सीईओ फोरम’ दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक भक्कम करील, असा दृढ विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशांच्या विकासातील सातत्य, उदयाला येत असलेले नवे तंत्रज्ञान, संकटांना दाद न देणारी जागितक पुरवठा साखळी आणि छोट्या उद्योगांची प्रगती, या समान ध्येयावर ‘इंडिया-युएस सीईओ फोरम’चे सहकार्य आधारलेले आहे, असा दावा यावेळी गोयल यांनी केला.

२०१४ साली भारत व अमेरिकेने एकत्र येऊन ‘इंडिया-युएस सीईओ फोरम’ची नव्याने स्थापना केली होती. यानंतर आयोजित करण्यात आलेली या फोरमची ही सहावी बैठक ठरते. दोन्ही देशांमधील उद्योगसमुहांचे सीईओज्‌‍चे सात कार्यगट तयार करण्यात आले असून त्यांनी भारत व अमेरिकेतील सहकार्याला फार मोठी संधी असणाऱ्या सात क्षेत्रांची माहिती सादर केली.

या सात क्षेत्रांमध्ये उद्योजकता विकास व छोट्या उद्योगांना चालना देणे, आरोग्य व औषधनिर्मिती क्षेत्र, अंतराळ व संरक्षण, डिजिटल क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा-पाणी व पर्यावरण, पायाभूत सुविधाक्षेत्र व उत्पादन क्षेत्र, वित्तविषयक सेवा आणि व्यापार व गुंतवणूक, यांचा समावेश आहे.

सदर फोरममध्ये होणारा संवाद या क्षेत्रातील भारत व अमेरिकेच्या सहकार्याचा आराखडा निश्चित करील, असा दावा यावेळी करण्यात आला. तसेच या सीईओ फोरममुळे दोन्ही देशांमधील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही सांगितले जाते. २०२०-२१च्या वित्तीय वर्षात भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार ८०.५ अब्ज डॉलर्सवर होता. तर २०२१-२२च्या वित्तीय वर्षात हाच व्यापार १२० अब्ज डॉलर्सवर गेला. या वाढीकडे सीईओ फोरममध्ये लक्ष वेधण्यात आले. ही बाब लक्षात आणून देऊन व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी सदर फोरम दोन्ही देशातील उद्योगक्षेत्रामधील संवादासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे म्हटले आहे.

याबरोबरच भारत व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठीही लाभदायी ठरणाऱ्या क्षेत्रांकडे लक्ष वेधण्याचे काम या फोरमद्वारे केले जात असल्याचे सांगून यावर पियूष गोयल यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी, तर अमेरिकेडून ‘लॉक्‌‍हीड मार्टिन’चे अध्यक्ष व सीईओ जेम्स टायस्लेट यांनी या फोरमचे नेतृत्त्व केले. पुढच्या काळात होणाऱ्या फोरमच्या बैठकीमधील चर्चेसाठी आवश्यक असलेल्या आराखड्यावरही यावेळच्या बैठकीत चर्चा पार पडल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, भारत व अमेरिकेमधील व्यापार तब्बल ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय दोन्ही देशांनी समोर ठेवले आहे. मात्र व्यापारी वाद तसेच इतर काही गोष्टींवरील मतभेद हे ध्येय गाठण्याच्या आड येत असल्याची चिंता दोन्ही देशांच्या उद्योगक्षेत्राकडून व्यक्त करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर सदर फोरममध्ये पार पडलेल्या चर्चेचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply