वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या आणि या साथीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या या दोन्ही आघाडीवर अमेरिका, इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांनी चीनला मागे टाकले. आपण ही साथ रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा चीन करीत आहे. मात्र चीनच्या या दाव्यावर अमेरिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅले यांनीही चीनने दिलेली आकडेवारी अचूक नसल्याचा ठपका ठेवला आहे.
चीनमध्ये कोरोनाव्हायरसने ३,३३० जणांचा बळी घेतला. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या ८२ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. मात्र आता आपण या साथीवर नियंत्रण मिळविल्याचा चीनने दावा केला आहे. १.५ अब्ज इतकी लोकसंख्या असलेल्या या देशात या साथीची लागण झालेल्यांची संख्या इतकी कमी कशी काय असू शकते, असा प्रश्न विचारुन हॅले यांनी त्यावर संशय व्यक्त केला. चीन आता इतर देशांना मदत करुन स्वतः ची प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी चीन कोरोनाव्हायरस संर्दभातील माहिती लपवून ठेवत असल्याचा आरोप हँले यांनी केला.
याआधीही निकी हँले यांनी चीन कोरोनाव्हायरसच्या संर्दभातील खरी माहिती उघड करीत नसल्याचा आरोप केला होता. चीनने वेळीच या साथीची माहिती दिली असती तर ही साथ जगभरात पसरली नसती. जगावर आलेल्या या संकटाला चीनच जबाबदार आहे. आता चीन इतर देशांना सहाय्य करीत असल्याचे दाखवून चीन आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका हॅले यांनी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील चीनवर असे गंभीर आरोप करुन कोरोनाव्हायरसचा उल्लेख ‘चायनीज व्हायरस’ असा केला होता. यावर चीनने आक्षेप नोंदविला होता. तसेच ट्रम्प यांनी या विषाणूचा उल्लेख ‘चिनी व्हायरस’ असा करुन चीनवरील दडपण वाढविले होते.