प्योंगटेक – जपान आणि दक्षिण कोरियाबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याची घोषणा करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन शुक्रवारी दक्षिण कोरियात दाखल झाले. येथील सेमीकंडक्टर्सच्या प्रकल्पाला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या या दौऱ्याचे महत्त्व अधोरेखित केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दक्षिण कोरियात दाखल होऊन काही तास उलटत नाही तोच, चीनने साऊथ चायना सीच्या क्षेत्रात युद्धसराव सुरू केला. तसेच तैवान व जपानच्या सागरी क्षेत्राजवळही चीनने आपल्या नौदलाच्या हालचाली वाढविल्या आहेत. याद्वारे चीनची कम्युनिस्ट राजवट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इशारा देत असल्याचा दावा केला जातो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन शुक्रवारी दक्षिण कोरियात दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दक्षिण कोरियातील प्योंगटेक येथील सेमीकंडक्टर्सच्या प्रकल्पाला भेट देऊन आपल्या या पाच दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात केली. लवकरच दक्षिण कोरियन कंपनी अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात सेमीकंडक्टर्सचा प्रकल्प उभारणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या प्रकल्पाला भेट दिल्याचे दिसत आहे. यावेळी दक्षिण कोरियाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल हे देखील उपस्थित होते.
अमेरिका आणि दक्षिण कोरियातील लष्करी सहकार्य वाढविण्याबाबत तसेच अमेरिकेला नवे तळ उपलब्ध करून देण्यावर दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा होईल. याशिवाय दक्षिण कोरियाला ‘क्वाड’ देशांच्या संघटनेत सामील करुन घेण्याबाबतही या बैठकीत हालचाली होऊ शकतात. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या या संघटनेत दक्षिण कोरिया सामील झाल्यास चीनच्या वर्चस्वाला आव्हान देता येईल, असे अमेरिकी विश्लेषकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या या दौऱ्याला फार मोठे महत्त्व असल्याचे अमेरिकी माध्यमे सांगत आहेत.
पण यामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे. अमेरिका व जपानच्या या क्षेत्रातील हालचाली प्रक्षोभक असल्याची टीका चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केली. तर तैवानला शस्त्रसज्ज करण्यासाठी जपानने विनाकारण धडपड करू नये, असा इशारा परराष्ट्रमंत्री ई यांनी दिला. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते यांग जिएची यांनी देखील तैवानच्या प्रश्नावरुन जपान व अमेरिकेला फटकारले. अमेरिकेने तैवान कार्डचा वापर करणे सुरू ठेवले तर चीनच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावी लागतील, असे जिएची म्हणाले. दरम्यान, गेल्या चोवीस तासात चीनने साऊथ चायना सी तसेच तैवानच्या आखातात केलेल्या हालचाली चीनची अस्वस्थता वाढल्याचे दाखवून देत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन दक्षिण कोरिया, जपानच्या दौऱ्यावर असेपर्यंत अर्थात पुढील पाच दिवसांसाठी चीनने साऊथ चायना सीच्या क्षेत्रात आपला युद्धसराव सुरू केला आहे. तर चिनी युद्धनौकांची जपान व तैवानच्या सागरी क्षेत्रातील वाढती गस्त चिंता वाढविणारी असल्याचे जपानने म्हटले आहे. लिओनिंग ही विमानवाहू युद्धनौका तैवानच्या सागरी क्षेत्राजवळून रवाना करून चीन जपान आणि अमेरिकेला चिथावणी देत असल्याचा आरोप जपानने केला आहे.