वॉशिंग्टन – ‘जागतिक स्तरावर महासत्तांमधील संघर्ष पेट घेण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता दिवसेंदिवस वाढते आहे. अमेरिकेने गेली 70 वर्षे गाजविलेले लष्करी वर्चस्व आता हळुहळू कमी होत चालले आहे. युद्धातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात अमेरिकेला आव्हान मिळत आहे’, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी दिला. अमेरिकी जवानांना उद्देशून केलेल्या वक्तव्यात जनरल मिले यांनी, युद्धात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नमूद केले. भविष्यातील संघर्षात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’सह रोबोटिक रणगाडे, जहाजे यांचा समावेश असेल, असे अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी सांगितले.
अमेरिकेच्या ‘वेस्ट पॉईंट मिलिटरी ॲकॅडमी’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान कार्यक्रमादरम्यान जनरल मिले यांनी, देशातील भावी लष्करी अधिकाऱ्यांना भविष्यातील संभाव्य संघर्षाची जाणीव करून दिली. ‘अमेरिका ही अनभिषिक्त जागतिक महासत्ता राहिलेली नाही. युरोपात रशियाच्या आक्रमकतेमुळे तर आशियात चीनच्या वाढत्या आर्थिक व लष्करी सामर्थ्याने अमेरिकेला आव्हान दिले आहे. उत्तर कोरियाकडून देण्यात येणाऱ्या आण्विक धमक्या आणि आखात व आफ्रिकेतील दहशतवादी कारवायांमुळे निर्माण झालेले अस्थैर्य या गोष्टीदेखील अमेरिकेच्या सामर्थ्याची चाचणी घेत आहेत’, याची जाणीव अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी करून दिली.
सध्याच्या काळात युद्धाचे स्वरुप वेगाने बदलताना दिसत आहे, असे सांगून जनरल मिले यांनी रशिया-युक्रेन युद्धाकडे लक्ष वेधले. आक्रमणाला योग्य प्रत्युत्तर दिले नाही तर त्याने आक्रमक अधिक बेदरकार होतो, हा धडा रशिया-युक्रेन युद्धातून जगाला मिळाला आहे, असा दावा त्यांनी केला. त्याचवेळी युक्रेनची राजधानी किव्हसह वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या संघर्षाचा उल्लेख करून हा ‘अर्बन वॉरफेअर’चा भाग असल्याचे जनरल मिले म्हणाले. या अर्बन वॉरफेअरसाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून भविष्यातही तेच उपयुक्त ठरेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘भविष्यातील संघर्षात रोबोटिक टँक्स, जहाजे, विमाने यांच्यासह लढावे लागणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स, सिंथेटिक फ्युएल, थ्रीडी मॅन्युफॅक्चरिंग व ह्युमन इंजिनिअरिंग यासारख्या तंत्रज्ञानाचे सहाय्य घ्यावे लागेल’, असेही अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी बजावले आहे.