वॉशिंग्टन – ‘पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रसज्ज करणे रोखले नाही तर येत्या काळात अमेरिका आणि रशियन लष्करात थेट संघर्ष भडकू शकतो. लष्कराची मालवाहू विमाने, लष्करी वाहने किंवा अन्य मार्गाने युक्रेनमध्ये शस्त्र घेऊन जाणार्यांना रशियन लष्कर लक्ष्य करील’, असा सज्जड इशारा अमेरिकेतील रशियाचे राजदूत ऍनाटोली ऍन्टोनोव्ह यांनी दिला.
युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाची मूळे आठ वर्षांपूर्वीच रूजलेली होती, असा दावा ऍन्टोनोव्ह यांनी अमेरिकन वृत्तसंस्थेशी बोलताना केला. २०१४ साली पाश्चिमात्य देशांनी युक्रेनमधील लोकनियुक्त सरकार बदलून पाश्चिमात्यांच्या इशार्यावर चालणारे सरकार सत्तेवर आणले होते. या सरकारने नाटो आणि युरोपिय महासंघाबरोबर जवळीक निर्माण केली. तसेच पूर्व युक्रेनमधील रशियासमर्थकांवर अमानवी अत्याचार सुरू केले, त्याचवेळी सध्या सुरू असलेल्या युद्धाची मूळे मजबूत झाली होती, अशी टीका रशियन राजदूतांनी केली.
युक्रेनला नाटोत सहभागी करून घेण्याच्या हालचालींवर रशियाने याआधीही इशारा दिला होता. पण याकडे दुर्लक्ष करून नाटोने युक्रेनजवळ मोठ्या प्रमाणात तैनाती वाढविली होती.