तेहरान – 22 वर्षाच्या माहसा अमिनी या तरुणीचा बळी गेल्यानंतर इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटले होते. या आंदोलनाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच, 16 वर्षाच्या अरसा पनाही नावाच्या विद्यार्थिनीचा इराणच्या यंत्रणांनी बळी घेतल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी व इराणी राजवटीचे गुणगान करणारे गीत गाण्यास नकार दिल्याने यंत्रणेच्या जवानांनी अरसा पनाही हिला मारहाण केली होती. यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती इराणमधील शिक्षकांच्या संघटनेने दिली. यानंतर इराणमधील आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली असून यामधील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग हे इराणच्या राजवटीसाठी फार मोठे आव्हान बनल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.
13 ऑक्टोबर रोजी अरसा पनाही हिने इराणच्या सुरक्षा यंत्रणेच्या जवानांनी सांगूनही आयातुल्लाह खामेनी व इराणी राजवटीचे गुणगान करणारे गीत गाण्यास नकार दिला होता. यानंतर जवानांनी तिला मारहाण केली. यामुळे जखमी झालेल्या अरसाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाला. पण तिच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नाही, असा दावा इराणच्या सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तर इराणची माध्यमे अरसा हृदयविकाराने दगावल्याचे सांगत आहेत. मात्र इराणमधील शिक्षकांच्या संघटनेने मारहाण झाल्यानेच अरसा दगावल्याचे म्हटले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इराणच्या राजवटीविरोधातील संताप अधिकच तीव्र झाल्याचे दिसत असल्याचे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे.
पाश्चिमात्य माध्यमांमध्ये इराणच्या विद्यार्थीवर्गाची प्रतिक्रिया येऊ लागल्या असून इराणी राजवटीविरोधातील त्यांचा संताप वाढत चालल्याचे दिसते. विशेषतः युवा विद्यार्थ्यांनी पुढच्या काळात या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. सुरक्षेखातर त्यांची नावे माध्यमांनी उघड केलेली नाहीत. पण त्यांच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे इराणच्या राजवटीविरोधातील आंदोलन इतक्यात शमणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिक्षकवर्ग, कामगार, व्यापारी व उद्योगक्षेत्रातूनही इराणच्या राजवटीविरोधात खदखदणाऱ्या असंतोषाला हिजाबविरोधी आंदोलनाद्वारे वाट मिळाली असल्याचे दावेही करण्यात येत आहेत.
या आंदोलनात विद्यार्थिनी व तरुणी सहभागी झाल्या होत्या. पण आता हिजाब परिधान करणाऱ्या महिलाही इराणच्या राजवटीविरोधात निदर्शने करीत आहेत. विशेषतः युवावर्गाचा या निदर्शनांमधील सहभाग इराणच्या यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे करीत आहे. पुढच्या काळात त्याचे पडसाद उमटू शकतात, असा दावा काही पाश्चिमात्य वृत्तसंस्थांनी केला आहे. जगभरातील महिला इराणमधील या आंदोलनाला वेगवेगळ्या मार्गाने पाठिंबा देत आहेत. इराणचा समर्थक देश मानल्या जाणाऱ्या लेबेनॉमध्येही विद्यार्थ्यांनी इराणमधील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. याचा दबाव इराणच्या राजवटीवर येत असल्याचे दिसते.
इराणमधील या आंदोलनामागे अमेरिका व इस्रायलचा हात असल्याचे सांगून यामागे इराणच्या राजवटीविरोधात कारस्थान असल्याचा ठपका या देशाचे धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी यांनी ठेवला होता. इराणच्या राजकीय व्यवस्थेनुसार सर्वोच्च धर्मगुरू खामेनी यांच्याच हाती इराणचे राजकीय सर्वाधिकार एकवटलेले आहेत. 1979 साली झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर या देशात प्रस्थापित झालेली राजवट इराणच्या सध्याच्या पिढीला मान्य नाही. तसेच बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक समस्यांनी ग्रासलेली इराणची जनता देखील खामेनी यांच्या राजवटीवर नाराज असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी आपल्या विरोधातील आंदोलन दडपण्यासाठी इराणची राजवट हिंसक कारवाया करीत आहे, यावरही इराणच्या जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.