जेरूसलेम/वॉशिंग्टन – इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन वेगाने हालचाली करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी बायडेन प्रशासनाने इराणला निर्बंधातून सवलती देण्याचे संकेतही दिले. यामुळे इस्रायलचा बायडेन प्रशासनाबाबत असलेला अविश्वास अधिकच वाढला असून इस्रायल याकडे संशयाने पाहत आहे. इराणबरोबरील अणुकराराबाबतची इस्रायलची परखड भूमिका मांडण्यासाठी इस्रायलचे शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यात अमेरिकेच्या दौर्यावर रवाना होत आहे. अमेरिका व इस्रायलच्या अधिकार्यांमध्ये होणार्या या बैठकीवर आखातातील घडामोडी अवलंबून असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.
व्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराणमध्ये अणुकराराबाबतच्या चर्चेला दोन आठवडे पूर्ण झाले असून सोमवारपासून नव्याने वाटाघाटी होतील. इराणने २०१५ सालच्या अणुकरारात सामील व्हावे, यासाठी बायडेन प्रशासनाने निर्बंधातून सूट देण्याची तयारी वर्तविली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. पुढच्या आठवड्यात बायडेन प्रशासन इराणसमोर यासंबंधीचा प्रस्ताव ठेवणार असल्याचा दावा केला जातो. इराणबरोबरचा अणुकरारासाठी बायडेन प्रशासनाच्या सुरू असलेल्या या हालचालींमुळे इस्रायल नाराज झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
अमेरिकेने इराणबरोबर नवा अणुकरार करावा आणि त्यामध्ये इराणची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांबाबत इस्रायलला वाटत असलेली चिंता मांडावी, असे इस्रायलने सुचविले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून बायडेन प्रशासन २०१५ साली इराणबरोबर झालेला अणुकरार पुनरूज्जीवित करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच इस्रायलच्या मुद्यांबाबतही बायडेन प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. याशिवाय अणुकराराच्या मोबदल्यात इराणला दिलेल्या सवलती किंवा निर्बंधातून सूट याबाबत बायडेन प्रशासनाचे धोरण पारदर्शी नसल्याची टीका इस्रायली अधिकार्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केली.
बायडेन प्रशासनाच्या या भूमिकेमुळे उभय देशांच्या संबंधात नैराश्य निर्माण झाल्याचा आरोप इस्रायलकडून केला जातो. या पार्श्वभूमीवर, इराणबाबतची आपल्या देशाची परखड भूमिका मांडण्यासाठी इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिर बेन-शबात, मोसादचे प्रमुख योसी कोहेन, इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी आणि लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख तमिर हेमॅन अमेरिकेच्या विशेष दौर्यावर जाणार आहेत. यावेळी बेन-शबात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांची भेट घेतील. तर कोहेन इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधीचे महत्त्वाचे पुरावे बायडेन प्रशाससमोर मांडणार असल्याचा दावा केला जातो.
याशिवाय अमेरिकेने इराणसोबत अणुकरार करू नये, यासाठी इस्रायलच्या सुमारे दोन हजार निवृत्त लष्करी अधिकार्यांनी बायडेन प्रशासनाला पत्र लिहिले आहे. तर अमेरिकेतील ज्यूधर्मिय नेते व गट देखील सदर करार रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. बायडेन प्रशासनाने अणुकरारासाठी केलेल्या हालचालींच्या विरोधात अमेरिकन कॉंग्रेसमधील रिपब्लिकन पक्षाकडून प्रतिक्रिया उमटू शकते. यानंतरही इस्रायलच्या भूमिकेचा आदर केला नाही तर, या दोन्ही देशांमध्ये निर्माण होत असलेली दरी अधिकच रुंदावेल, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.