पाश्चिमात्यांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे जगावर भयावह आर्थिक संकट

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन इशारा

मॉस्को – युक्रेन युद्धावरून पाश्चिमात्यांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे जागतिक स्तरावर मोठे आर्थिक संकट ओढविले असून अनेक गरीब देशांमध्ये अन्नटंचाई व उपासमारीची स्थिती ओढविली आहे, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. रशिया या निर्बंधांना खंबीरपणे तोंड देत असून अर्थव्यवस्था हळुहळू सावरत असल्याचा दावाही त्यांनी केला. पुतिन हा दावा करीत असतानाच रशियाचे चलन रुबल ही जगातील ‘बेस्ट परफॉर्मिंग करन्सी’ ठरल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

अमेरिका व मित्रदेशांनी रशियन अर्थव्यवस्थेवर जबरदस्त निर्बंध लादले असून रशियाची मध्यवर्ती बँक तसेच परकीय गंगाजळीला लक्ष्य केले आहे. रशियाकडे असलेल्या सोन्याच्या राखीव साठ्यांविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. या निर्बंधांचा उल्लेख रशियाने आर्थिक युद्ध असा केला असून त्यातून मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्याचे परिणामही समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक अभ्यासगट तसेच अर्थतज्ज्ञांनी, पाश्चिमात्यांनी लादलेल्या निर्बंधांना रशियन अर्थव्यवस्था तोंड देऊ शकते, याकडे लक्ष वेधले आहे.

या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते. रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाचे नुकसान होण्याऐवजी जागतिक अर्थव्यवस्थेलाच मोठा फटका बसत असल्याची जाणीव करून दिली. युरोपिय महासंघासह ब्रिटन व अमेरिकेत उडालेला महागाईचा भडका, अनेक देशांमध्ये उत्पादन तसेच मागणीत झालेली घट आणि आफ्रिकी तसेच आशियाई देशांमध्ये निर्माण झालेली अन्नटंचाई व उपासमारी यांचा उल्लेख रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला.

‘या सर्व परिणामांसाठी पाश्चिमात्य जगतातील उच्चभ्रूंचा गट कारणीभूत आहे. आपला जागतिक स्तरावरील प्रभाव कायम राखण्यासाठी ते उर्वरित जगाला वेठीस धरून किंमत मोजण्यास भाग पाडत आहेत’, असा आरोप पुतिन यांनी केला. इतर देशांना मोठा फटका बसत असताना रशिया निर्बंधामुळे निर्माण झालेल्या दबावाला चांगल्या प्रकारे तोंड देत आहे, असा दावाही रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला.

रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्याला दुजोरा देणारी माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘ब्लूमबर्ग’ने रशियाचे चलन रुबल ही या वर्षातील ‘बेस्ट परफॉर्मिंग करन्सी’ ठरल्याचे जाहीर केले आहे. पाश्चिमात्यांनी टाकलेल्या निर्बंधांमुळे मार्च महिन्यात एका अमेरिकी डॉलर्ससाठी 120हून अधिक रुबल मोजणे भाग पडत होते. गुरुवारी झालेल्या व्यवहारांमध्ये एका डॉलरसाठी 65 रुबलची नोंद झाली. यापूर्वी 2020 साली रुबल या पातळीवर होता. पाश्चिमात्यांच्या निर्बंधांनंतरही रुबलने आपले मूल्य स्थिर राखणे हे रशियाच्या आर्थिक निर्णयांना मिळालेले यश मानले जाते.

leave a reply