गोपेश्वर – उत्तराखंडच्या चमोलीमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या हिमस्खलनात ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’च्या (बीआरओ) आठ कर्मचार्यांचा बळी गेला आहे. तसेच ३१ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या हिमस्खलानात मोठा ढिगारा खाली येऊन नीति व्हॅलीतील सुमना भागात असलेल्या ‘बीआरओ’च्या छावणीवर कोसळला. फेब्रुवारी महिन्यात चमोलीतच धौली गंगेमध्ये हिमनदीचा काही भाग कोसळून मोठा जलप्रलय आला होता. यामध्ये सुमारे २०० जणांचा बळी गेला होता.
शुक्रवारी रात्री चीन सीमेपासून काही अंतरावर असलेल्या चमोलीतील नीति व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. या भागात मोठ्या प्रमाणावर ‘बीआरओ’कडून रस्ते उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी येथे दोन ठिकाणी बीआरओच्या कामगारांसाठी छावण्या तयार करण्यात आल्या आहेत. हिमस्खलनात मोठा ढिगारा हा यातील एका छावणीतील काही भागावर कोसळला. सुदैवाने त्याच शेजारी असलेल्या दुसर्या छावणीला कोणतेही नुकसान झाले नाही. या दोन्ही छावण्यांमध्ये सुमारे ४३० कामगार होते. यातील सुमारे ५० कामगार बेपत्ता असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती.
शुक्रवारी रात्रीच लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांनी बचावकामाला सुरुवात केली. शुक्रवारी रात्री दोन जणांचे शव सापडले होते, तर शनिवारी सकाळी आणखी सहा जणांचे मृतदेह बचावपथकाला हा बर्फाचा ढिगारा उपसताना सापडले. यामुळे आपत्तीत बळी गेलेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. तर सुमारे ३९१ कामगार सुखरूप येथून काही अंतरावर असलेल्या ‘इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसां’च्या (आयटीबीपी) छावणीत पोहोचल्याची अधिकार्यांनी दिली. त्याचवेळी सुमारे ३१ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांनी या भागाचा हवाई दौरा केला व येथे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. काही जखमी कामगारांना बचाव दलाने वाचविले असून त्यांच्यावर जोशीमठ येथील लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
नीति व्हॅलीतील ज्या सुमना भागात ही घटना झाली, तेथून २५ किलोमीटर अंतरावर फेब्रुवारी महिन्यात नंदादेवी ग्लॅशियरचा एक भाग धौलीगंगेच्या प्रवाहात कोसळून प्रचंड जलप्रलय आला होता. या जलप्रलयामुळे जोशीमठ जवळ मोठी हानी झाली होती. या प्रवाहात दोन जलविद्युत प्रकल्प वाहून गेले होते, तसेच पाच ते सहा गावांमध्येही मोठे नुकसान झाले होते. जलविद्युत प्रकल्पात काम करणार्यांबरोबर सुमारे २४० जण या दुर्घटनेनंतर बेपत्ता होते. ते येथील टनेलमध्ये अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. त्यांना वाचविण्यासाठी व्यापक बचावकार्य लष्कराने हाती घेतले होते. यातील काही जण वाचले. तर ८० जणांचे मृतदेह टनेलमधील ढिगारा उपसताना सापडले होते. अद्याप १२६ जणांचा कोणताही शोध लागलेला नाही. या सर्वांना मृत मानण्यात आले आहे.
दरम्यान, चमोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव होत असून अद्यापही सुमना भागात बचावकार्य सुरू आहे. हिमवर्षावामुळे यामध्ये अडथळे येत आहेत. या बचावकार्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे (एसडीआरएफ) जवानही सहभागी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंड सरकारला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. १९९१ साली सुमनामध्येच झालेल्या हिमस्खलनात आयटीबीपीच्या ११ जवानांचा बळी गेला होता. हिमवृष्टी होत असताना हिमालयीन क्षेत्रात हिमस्खलनाच्या कित्येक घटना घडत असतात.