वॉशिंग्टन/जीनिव्हा – चीनचा मंदावलेला विकासदर आणि अमेरिकेच्या आर्थिक उत्पादनातील घसरण यामुळे युरोपवरील मंदीचे सावट अधिकाधिक गडद होत चालले आहे. रशियाच्या इंधनावर आधारलेल्या युरोपवरील इंधनाचे संकट येत्या काळातही सुरू राहणार आहे. यामुळे युरोपवर आर्थिक मंदीचे संकट घोंघावत असून ते दिर्घकाळासाठी असेल, असा इशारा वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी दिला. तर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संकटांमुळे जग मंदीच्या गर्तेत ढकलला जात असल्याचे जागतिक व्यापार संघटनेने म्हटले आहे.
अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी कठोर शब्दात युरोपची कानउघडणी केली. युरोपिय देशांच्या अर्थव्यवस्थेवरील संकटासाठी थेट रशियाने युक्रेनवर केलेले हल्ले आणि इंधनाची केलेली कोंडी जबाबदार असल्याचा आरोप युरोपिय देशांकडून केला जातो. पण वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांनी या आर्थिक मंदीसाठी वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये इतरत्र झालेल्या घडामोडी देखील जबाबदार असल्याचे म्हटले आहे. चीनच्या विकासदरातील झालेली पडझड आणि अमेरिकेच्या आर्थिक उत्पादनातील घसरण, या दोन्ही गोष्टी देखील कारणीभूत असल्याचे मालपास म्हणाले.
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका व चीनमधील ही आर्थिक पडझड विकसनशील देशांवर गंभीर परिणाम करणारी ठरू शकते, असे मालपास यांनी बजावले. तर रशिया-युक्रेनमधील युद्ध नाही तर कोरोनाच्याही आधीपासून युरोपिय देशांमधील गरीबी वाढत चालल्याचे मालपास यांनी लक्षात आणून दिले. युरोपमधील गरीबी दूर करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न २०१५ सालानंतर कमी झाले. त्याचबरोबर युरोपिय देशांमधील सरासरी उत्पन्नात देखील चार टक्क्यांची घट झाली, याकडे मालपास यांनी लक्ष वेधले. १९९० सालानंतर पहिल्यांदाच युरोपिय देशांवर असे संकट कोसळल्याचे वर्ल्ड बँकेच्या प्रमुखांनी बजावले आहे.
येत्या काळात विकसनशील देशांसमोर अन्नधान्य, खत आणि इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ होईल. यामुळे चलनवाढ, चलनाचे अवमुल्यन आणि भांडवलाच्या प्रवाहावर याचा परिणाम होणार असल्याचा निष्कर्ष मालपास यांनी नोंदविला आहे. विकसनशील देशांची मागणी पूर्ण करण्याएवढे जागतिक भांडवलच उपलब्ध नसल्याचे मालपास म्हणाले.
वर्ल्ड बँकेचे प्रमुख युरोपिय देशांच्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करीत असताना, जागतिक व्यापार संघटनेने जगभरात मंदी येणार असल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील युरोपिय देशांवरील आर्थिक संकटाबाबत असाच इशारा दिला होता.