वॉशिंग्टन – जागतिक अर्थव्यवस्थेसमोर गेल्या चार दशकांमधील सर्वाधिक कठीण व गुंतागुंतीची आव्हाने उभी राहिली आहेत. वर्ल्ड बँक, नाणेनिधी व आघाडीच्या मध्यवर्ती बँका हे धोके ओळखू शकलेल्या नाहीत, असा इशारा अमेरिकेचे माजी अर्थमंत्री लॅरी समर्स यांनी दिला. दरम्यान, जगातील आघाडीच्या कंपन्यांना आर्थिक मंदी येणार असल्याच खात्री पटली असून 90 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी त्यासाठी तयारी सुरू केल्याचा अहवाल ‘द कॉन्फरन्स बोर्ड’ या अमेरिकी अभ्यासगटाने प्रसिद्ध केला आहे.
गेल्या महिन्याभरात जगातील प्रमुख अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, वित्तसंस्था तसेच अभ्यासगट सातत्याने जागतिक अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीकडे लक्ष वेधत आहेत. काही तज्ज्ञांनी अमेरिका व युरोपसह जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आधीच मंदीत असल्याचे सांगून सदर देश व त्यांचे नेतृत्त्व ही बाब मान्य करीत नसल्याचा ठपका ठेवला आहे. अमेरिकेचे माजी अर्थमंत्री समर्स यापैकी एक असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या आर्थिक धोरणांवर सातत्याने टीकास्त्र सोडले आहे. यापूर्वी बायडेन यांच्या निर्णयांमुळेच अमेरिकी अर्थव्यवस्था संकटात सापडल्याचा आरोपही माजी अर्थमंत्र्यांनी केला होता.
‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स’च्या कार्यक्रमात समर्स यांनी जागतिक अर्थव्यवस्था संकटात असल्याची जाणीव करून दिली. यासाठी जगातील प्रमुख वित्तसंस्था तसेच मध्यवर्ती बँका जबाबदार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. ‘जागतिक अर्थव्यवस्थेसमोर गेल्या 40 वर्षातील सर्वाधिक कठीण व गुंतागुंतीची आव्हाने उभी ठाकली आहेत. मी माझ्या आयुष्यात अर्थव्यवस्थेसमोर इतकी गंभीर आव्हाने असल्याचे पाहिलेले नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती इतकी गंभीर होण्यामागे जगातील प्रमुख वित्तसंस्था तसेच मध्यवर्ती बँकाही जबाबदार आहेत. महागाईच्या भडक्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले व संकटाला योग्य रितीने प्रतिसाद दिला नाही’, अशा शब्दात समर्स यांनी मंदीच्या धोक्याची जाणीव करुन दिली.
मंदीच्या धोक्याची तुलना आगीशी करताना, ही आग विझविण्यासाठी आवश्यक असणारे अग्निशमन दल अजून बाहेरच पडलेले नाही, अशा शब्दात त्यांनी जागतिक नेतृत्व व संस्थांना धारेवर धरले. दरम्यान, जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांना मंदीची जाणीव असून त्यांनी तशी तयारीही सुरू केल्याचा दावा ‘द कॉन्फरन्स बोर्ड’ या अमेरिकी अभ्यासगटाने केला. जगभरातील 60 देशांमध्ये पसरलेल्या या अभ्यासगटाने प्रमुख कंपन्यांच्या ‘सीईओं’शी संपर्क साधून नवा अहवाल सादर केला. या अहवालानुसार, जगातील 90 टक्क्यांहून अधिक ‘सीईओं’नी अमेरिका तसेच युरोपिय महासंघाला मंदीचा फटका बसणार असल्याचे मत व्यक्त केले.
येत्या वर्षभरात अमेरिका व युरोपमध्ये आर्थिक मंदी येणार असून प्रमुख कंपन्यांनी त्यासाठी धोरणे आखण्यास सुरुवात केल्याचे ‘सीईओं’नी म्हटले आहे.