हल्ले चढवून अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर देण्याची हौथी बंडखोरांची धमकी

सना – इस्रायल आणि हमासमध्ये संघर्षबंदी लागू होऊन दोन दिवस उलटत नाही तोच, येमेनमधील हौथी बंडखोरांनी आखातातील नव्या संघर्षाची धमकी दिली. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने हौथी संघटनेच्या दोन वरिष्ठ नेत्यांवर आर्थिक निर्बंध टाकले होते. यामुळे संतापलेल्या हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर हल्ले चढवून याला उत्तर दिले जाईल, असे धमकावले. सौदीने अपेक्षाही केली नसेल, अशा ठिकाणी हल्ले चढविले जातील, असा इशारा हौथींनी दिला.

हल्ले चढवून अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर देण्याची हौथी बंडखोरांची धमकीसौदी अरेबियाने येमेनमधील सर्व गटांना संघर्षबंदीचे आवाहन केल्यानंतरही हौथी बंडखोरांनी इंधनसंपन्न मारिब शहरावर हल्ले सुरू ठेवले होते. हौथी बंडखोरांच्या या कारवाईमुळे येमेनी जनतेची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप अमेरिकेने केला. तसेच गुरुवारी मारिबवरील हल्ल्याचे नेतृत्व करणार्‍या हौथी संघटनेच्या दोन वरिष्ठ कमांडर्सवर निर्बंध जाहीर केले. अमेरिकेने टाकलेल्या या निर्बंधांवर हौथी बंडखोरांनी टीका केली.

अमेरिकेच्या या निर्बंधांनी हौथी बंडखोर घाबरणार नसल्याची घोषणा, येमेनमधील ‘अन्सर अल्ला’ अर्थात हौथी या बंडखोर संघटनेचा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अली अल-हौथी याने केली. ‘आपल्या कमांडर्स आणि संघटनेवरील निर्बंध आणि कारवाई अशीच सुरू राहिली, तर या क्षेत्रातील युद्धखोर देशांमधील अपेक्षाही केली नसेल, अशा ठिकाणांवर हल्ले चढवू’, असा इशारा मोहम्मद हौथीने सोशल मीडियाद्वारे दिला.

हल्ले चढवून अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर देण्याची हौथी बंडखोरांची धमकीमोहम्मद अली अल-हौथीने थेट उल्लेख केला नसला तरी सौदीला उद्देशून हा इशारा दिल्याचा दावा केला जातो. हौथीच्या राष्ट्राध्यक्षाने दिलेल्या या धमकीनंतर, सौदीची राजधानी रियाधसह, जेद्दा, जिझानसारखे महत्त्वाची शहरे तसेच अराम्को या जगातील सर्वात मोठ्या इंधन कंपनीचे सौदीतील प्रकल्पांवरील हल्ल्याचा धोका वाढला आहे. याआधी हौथी बंडखोरांनी या सर्व ठिकाणांवर रॉकेट्स, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तसेच स्फोटकांनी सज्ज ड्रोन्सचे हल्ले चढविले होते.

धमकीच्या काही तास आधी हौथींनी सौदीच्या सीमेजवळ ड्रोन हल्ले चढविले होते. हौथींचे हे हल्ले उधळल्याचा दावा सौदीने केला होता. पण हौथीच्या राष्ट्राध्यक्षाने अनपेक्षित ठिकाणी हल्ले चढविण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे हल्लेखोर देशाला हादरा देणार्‍या ठिकाणांवर हौथी बंडखोरांकडून हल्ले केले जातील, असा दावा केला जातो. पर्शियन आखात ते रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणार्‍या सौदी तसेच पाश्‍चिमात्य देशांच्या इंधनवाहू किंवा मालवाहू जहाजांना हौथी बंडखोर लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

हल्ले चढवून अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर देण्याची हौथी बंडखोरांची धमकीयाशिवाय हौथी बंडखोर इस्रायलच्या दक्षिणेकडील इलॅट शहरालाही लक्ष्य करू शकतात. इराणसंलग्न असलेल्या हौथी बंडखोरांनी आपली क्षेपणास्त्रे दक्षिण इस्रायलपर्यंत पोहोचू शकतात, असा इशारा याआधी दिला होता. तर जानेवारी महिन्यात इस्रायलच्या लष्कराने देखील हौथींच्या क्षेपणास्त्र हल्ल्याविरोधात, इलॅट शहरातील लष्करी तळावर पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे हौथींचा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अली अल-हौथी याने दिलेल्या धमकीकडे गंभीरपणे पाहिले जात आहे.

दरम्यान, 2015 सालापासून सौदीसमर्थक अरब देशांच्या आघाडीने येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात संघर्ष पुकारला आहे. सहा वर्षांच्या या संघर्षात सव्वादोन लाखांहून अधिक जणांचा बळी गेला तर 31 लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत. या संघर्षामुळे 84 हजार मुलांचा भूकबळी गेला. सध्या मारिबच्या ताब्यासाठी हौथींनी सुरू केलेला संघर्ष असाच सुरू राहिला तर येथील विस्थापितांसाठी उभारलेल्या शिबिरातील तीन लाख 85 हजार नव्याने विस्थापित होतील, अशी भीती व्यक्त केली जाते.

leave a reply