सर्बियातील पाकिस्तानी दूतावासाच्या शेर्‍यांमुळे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार संकटात

पंतप्रधान इम्रान खानइस्लामाबाद – ‘‘पंतप्रधान इम्रान खान तुमच्या सरकारमध्ये पाकिस्तानातील महागाईचे याआधीचे सर्वच विक्रम मोडले आहेत. पाकिस्तानातील सरकारी अधिकारी अधिक काळ शांत राहू शकत नाहीत. तीन महिने बिनपगारी काम केल्यानंतर यापुढे सरकारी सेवेत राहू शकत नाही. पगार थकल्यामुळे मुलांच्या शाळेची फी भरू शकलो नाही. हाच का तुमचा नया पाकिस्तान?’’ सर्बियातील पाकिस्तानी दूतावासाच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर हा मेसेज प्रसिद्ध झाला. दूतावासाचे सोशल मीडियावरील अकाऊंट्स कुणीतरी हॅक केल्याचे सांगून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सारवासारव केली. पण पाकिस्तानातील महागाई आणि सरकारी अव्यवस्था दाखविणार्‍या या ट्विटमुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारची जगभरात नाचक्की झाली.

तीन वर्षांपूर्वी निवडणूक प्रचारांमध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या जनतेला ‘नया पाकिस्तान’ची स्वप्ने दाखविली होती. पण पाकिस्तानच्या सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने जनतेची घोर निराशा केल्याची जोरदार टीका पाकिस्तानात होत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमध्ये पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था आणि मित्रदेशांकडून सर्वाधिक कर्ज घेतले असून याचा बोजा पाकिस्तानी जनतेवर पडत असल्याचे ताशेरे ओढले जात आहेत.

नोव्हेंबर महिन्यातील पाकिस्तानचा महागाई निर्देशांक ११.५ टक्क्यांवर पोहोचला होता. तर गेल्याच महिन्यात सौदी अरेबिया आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी इम्रान खान यांनी मान्य केलेल्या अटी पाकिस्तानला आर्थिक डबघाईला आणणारा ठरेल, असे आरोप होत आहेत. या अटी समोर आल्यानंतर पाकिस्तानचा शेअर बाजार दोन हजार अंकांनी घसरला. याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटत असून इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर पकडत आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमधील तसेच पक्षातील नेतेही सरकारविरोधी भाषा बोलू लागले आहेत. काही मंत्री व पक्षनेते विरोधी पक्षांच्या संपर्कात असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. आपल्या पक्षातील नेते आपल्याच विरोधात बंड करतील, अशी भीती पंतप्रधान इम्रान खान यांना सतावित आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांच्या परदेश दौर्‍यावर बंदी टाकली आहे. पण यामुळे पाकिस्तानची आर्थिक दूरावस्था लपून राहिलेली नाही. सर्बियातील दूतावासाच्या सोशल मीडियावरील पोस्टने पाकिस्तानची कंगाली जगासमोर आणली आहे.

leave a reply