अनिश्चिततेच्या काळाला भारत अधिक समर्थपणे तोंड देईल

- प्रमुख आर्थिक सल्लागार नागेस्वरन यांचा विश्वास

नवी दिल्ली – युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या काळाला इतर देशांच्या तुलनेत भारत अधिक समर्थपणे तोंड देईल, असा विश्वास प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही. अनंता नागेस्वरन यांनी व्यक्त केला. भारताची वित्तीय व्यवस्था अधिक भक्कम बनली असून देशाच्या उद्योगक्षेत्राचे आर्थिक आरोग्यही उत्तम आहे. याच्या बळावर भारत अगदी विकसित देशांच्यापेक्षाही या अनिश्चिततेच्या काळाला अधिक चांगल्यारितीने तोंड देईल, असा दावा नागेस्वरन यांनी केला.

समर्थपणे तोंड देईलफेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांसमोर गंभीर आव्हान खडे ठाकले आहे. अमेरिकेसहीत युरोपातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्था युक्रेनच्या युद्धामुळे बाधित झाल्याचे दिसत आहे. यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता पुढच्या काळात आपला प्रभाव दाखविल आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही देश या संकटामुळे मंदीच्या फेऱ्यात अडकतील, असे निष्कर्ष मांडले जात असून अशा देशांमध्ये श्रीमंत व विकसित मानल्या जाणाऱ्या देशांचाही समावेश आहे. अशा काळातही भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी व्यक्त केला आहे.

देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागार ही. अनंता नागेस्वरन यांनी देखील युक्रेनच्या युद्धानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या काळाला भारत इतर देशांपेक्षा अधिक आत्मविश्वासाने सामोरा जाईल, असे म्हटले आहे. भारताच्या वित्तीय व्यवस्थेत, विशेषतः बँकिंग क्षेत्रात फार मोठ्या सुधारणा घडविण्यात आलेल्या आहेत. देशाच्या उद्योगक्षेत्राची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. या सुधारणा घडविण्यासाठी सोसावे लागणारे कष्ट भारताने गेल्या दशकात सहन केले होते, असे सांगून नागेस्वरन यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि उद्योगक्षेत्रावरचा विश्वास व्यक्त केला.

भारताची वित्तीय व्यवस्था सुधारलेली आहे व भारतीय उद्योगक्षेत्राचे आर्थिक आरोग्य ठणठणीत आहे. रिझर्व्ह बँकेकडे मुबलक प्रमाणात परकीय चलनाची गंगाजळी उपलब्ध आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात महत्त्वाचे बदल घडवून आपण या अनिश्चिततेच्या काळाचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भारत युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विकसित देशांपेक्षाही अधिक चांगल्यारितीने सामना करू शकेल, असा निष्कर्ष नागेस्वरन यांनी नोंदविला.

युक्रेनच्या युद्धामुळे महागाईचा भडका उडालेला आहे. इंधन व अन्नधान्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून सर्वच देश या महागाईचा सामना करीत आहेत. विशेषतः गव्हाच्या दरात झालेली वाढ जगासाठी चिंताजनक ठरत आहे. काही देशांमध्ये अन्नधान्याच्या वाढलेल्या दरांपेक्षाही त्याची उपलब्धता अधिक महत्त्वाची ठरते. मात्र इतर देशांच्या तुलनेत या आघाडीवर भारतातील परिस्थिती खूपच समाधानकारक आहे, याकडे नागेस्वरन यांनी लक्ष वेधले. अन्नसुरक्षेच्या आघाडीवर भारतातील स्थैर्य पुढच्या काळात अतिशय महत्त्वाचे ठरते, याची जाणीव या विधानांद्वारे नागेस्वरन यांनी करून दिली.

दरम्यान, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच इतर आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी पुढच्या काळात भारताचा आर्थिक विकासदर सर्वाधिक असेल, असा निष्कर्ष नोंदविला होता.

leave a reply