पाकिस्तानात लख्वीला झालेली शिक्षा म्हणजे धूळफेक

- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची टीका

नवी दिल्ली – २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या ‘झकीउर रेहमान लख्वी’ याला पाकिस्तानच्या न्यायालयाने १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याबाबतचा लख्वीवरील आरोप सिद्ध झाल्याने त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांवर असे आरोप ठेवून त्यांना शिक्षा केल्यासारखे भासविणे पाकिस्तानात नेहमीच केले जाते. ही निव्वळ धुळफेक आहे, असा ठपका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला आहे.

दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याचे टाळणार्‍या देशांवर ‘फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’द्वारे (एफएटीएफ) कारवाई केली जाते. यामध्ये आर्थिक निर्बंधांपासून ते आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून कर्ज नाकारण्यासारख्या अनेक कारवायांचा समावेश केला जातो. आत्तापर्यंत पाकिस्तानने दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी करण्याच्या आघाडीवर दाखविलेल्या अनास्थेमुळे या देशाला ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आले होते. तसेच याच्या काळ्या यादीत जायचे नसेल, तर दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखा व त्यासाठी कारवाई करा, असे ‘एफएटीएफ’ने बजावले होते. त्यासाठी पाकिस्तानला फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुदत दिली होती.

ही मुदत संपत आली असून फेब्रुवारीमध्ये ‘एफएटीएफ’च्या बैठकीत पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यासाठी भारत आपला प्रभाव वापरत असून यामुळे पाकिस्तान नक्कीच एफएटीएफच्या ब्लॅकलिस्टमध्ये जाईल, अशी चिंता या देशाचे विश्‍लेषक व पत्रकार व्यक्त करू लागले आहे. तसे झाले तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेकडून कर्ज मिळू शकणार नाही. अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली असताना, पाकिस्तानला या कर्जाची फार मोठी आवश्यकता आहे. म्हणूनच पाकिस्तानला नाईलाजाने दहशतवाद्यांवर कारवाई करावी लागत आहे.

मात्र ही कारवाई करीत असताना, दहशतवाद्यांच्या सुटकेचा मार्ग पाकिस्तानने खुला ठेवलेला आहे, हे लख्वीला सुनावण्यात आलेल्या शिक्षेवरून स्पष्ट होत आहे. २६/११चा गुन्हेगार असलेल्या लख्वी याला पाकिस्तानच्या न्यायालयाने दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले. यासाठी त्याला १५ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. गेल्या महिन्यात २६/११चा हल्ला घडवून आणणार्‍या ‘हफीज सईद’ याला पाकिस्तानात दुसर्‍याच एका आरोपाखाली शिक्षा झाली होती. तर एकाच दिवसापूर्वी पाकिस्तानच्या गुजरानवाला येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते.

लख्वीला झालेल्या शिक्षेचे टायमिंग पाकिस्तानचे हेतू स्पष्ट करीत आहे, अशा नेमक्या शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानला टोला लगावला. अशारितीने दहशतवादी नेत्यांना शिक्षा ठोठावल्यासारखे दाखविणे ही पाकिस्तानसाठी नेहमीचीच बाब ठरते, हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हास्यास्पद प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका श्रीवास्तव यांनी केली आहे.

leave a reply