वॉशिंग्टन – तवांगच्या एलएसीवर चीनच्या लष्कराने केलेल्या घुसखोरीनंतर, भारत व अमेरिकेच्या लष्करी सहकार्याचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले. अरुणाचल प्रदेशमध्ये चीन दाखवित असलेली आक्रमकता, भारत व अमेरिकेचे सुरक्षाविषयक सहकार्य अधिकाधिक भक्कम करणे आवश्यक आहे, याची जाणीव करून देतेे, असे अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे. अमेरिकी संसदेच्या इंडिया ‘कॉकस’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दोन्ही देशांच्या लष्करी भागीदारीसाठी विशेष आग्रह धरला असून चीनच्या आक्रमक हालचालींमुळे हे सहकार्य अनिवार्य बनल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
अमेरिका व मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी भारताबरोबरील अमेरिकेचे हे लष्करी सहकार्य महत्त्वाचे ठरते. ही अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची बाब ठरत, असे इंडिया कॉकसच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला भारताचा भूभाग बळकावायचा आहे, हे तवांगच्या एलएसीवरील चिनी लष्कराच्या कारवायांमुळे स्पष्ट झाले. याआधी २०२० साली देखील एलएसीवर चीनच्या सुनियोजित हल्ल्यामुळे भारताने आपले २० जवान गमावले होते. अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवरील चीनच्या कारवाया याची पुन्हा एकदा आठवण करून देणाऱ्या आहेत, असे इंडिया कॉकसने बजावले आहे.
चीनपासून असलेल्या या धोक्याची आधीच जाणीव झाल्याने इंडिया कॉकस भारत व अमेरिकेमधील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कारण जगातील सर्वात जूनी व सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या अमेरिका व भारतामधील हे नाते विशेष ठरते. यामुळेच भारताच्या सुरक्षेकडे अमेरिकेने अधिक संवेदनशीलतेने पहावे, असे आवाहन सदर निवेदनात करण्यात आले. भारत व अमेरिकेमधील गोपनीय माहितीची देवाणघेवाण, पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने, अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान या आघाड्यांवरील सहकार्य वाढवून चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, असे इंडिया कॉकसने म्हटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे अतिक्रमण रोखण्यासाठी ही बाब अत्यावश्यक आहे, असा दावा इंडिया कॉकसने केला.