तेहरान – ‘काही मिनिटांपूर्वीच फोर्दो येथील अणुप्रकल्पात युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे’, अशी माहिती इराणच्या रोहानी सरकारचे प्रवक्ते अली राबेई यांनी जाहीर केली. तर इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रयत्नात असल्याचे उघड झाल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला.
गेल्या आठवड्यात इराणने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला पाठविलेल्या पत्रात युरेनियमच्या संवर्धनाची मात्रा २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे स्पष्ट केले होते. इराणचे हे पाऊल २०१५ सालच्या अणुकराराचे उघड उल्लंघन ठरत असल्याचे दावे केले जात आहेत. सदर अणुकरारानुसार, इराणच्या युरेनियम संवर्धनाचे प्रमाण ३.६७ टक्के इतके निर्धारित केले होते. त्याचबरोबर नातांझ अणुप्रकल्पातच युरेनियमच्या संवर्धनाला मंजुरी होती. तसेच फोर्दो अणुप्रकल्पाचा वापर करण्यास मनाई होती. त्यामुळे इराणची घोषणा पाच वर्षांपूर्वीच्या कराराचे उल्लंघन असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.