इराणकडे मर्यादेपेक्षा १२ पट अधिक युरेनियमचा साठा

- अणुऊर्जा आयोगाचा आरोप

व्हिएन्ना – २०१५ साली पाश्चिमात्य देशांबरोबर झालेल्या अणुकराराचे इराणने उल्लंघन केले आहे. या अणुकराराची मर्यादा ओलांडून इराणने युरेनियमचा १२ पट अधिक साठा केल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने केला. मर्यादेपेक्षा अधिक साठा केल्याबद्दल इराणकडे समाधानकारक उत्तर नसल्याचा दावा अणुऊर्जा आयोगाने एका अहवालाद्वारे केला. अणुऊर्जा आयोगाने हे आरोप केल्यानंतर इराण अणुबाँब निर्मितीच्या जवळ पोहोचत असल्याचा इशारा काही लष्करी विश्लेषकांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दोन दिवसांपूर्वी सदस्य देशांना दिलेल्या गोपनीय कागदपत्रात इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत काही धक्कादायक निष्कर्ष नोंदविले आहेत. २ नोव्हेंबरपर्यंतच्या या अहवालानुसार, इराणकडे २,४४२.८ किलो वजनाचा अल्प-संवर्धित युरेनियमचा साठा आहे. २५ ऑगस्ट रोजी इराणकडे २१०५.४४ किलो वजनाचा सदर युरेनियमचा साठा होता. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यात इराणकडील युरेनियमच्या साठ्यात वाढ झाल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने निदर्शनास आणून दिले. पाच वर्षांपूर्वी इराणने अमेरिका व युरोपिय देशांबरोबर केलेल्या करारानुसार, इराणला फक्त २०२.८ किलो वजनाचा युरेनियमचा साठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अणुऊर्जा आयोगाने दिलेल्या मर्यादेपेक्षा इराणने १२ पट अधिक युरेनियमचा साठा केल्याचा आरोप आयोगाने आपल्या अहवालात केला.

या व्यतिरिक्त इराणने अणुकरारात ठरलेल्या मर्यादांचे उल्लंघन करुन युरेनियमवर काम सुरू ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरातून होणार्‍या आरोपांवर इराणने दिलेले स्पष्टीकरण विश्वासार्ह नव्हते, असेही आयोगाने आपल्या अहवालातील निष्कर्षात म्हटले आहे. काही छुप्या ठिकाणी आण्विक सामग्री साठवल्याच्या आरोपांवर इराणचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याची टीका आयोगाने केली. इराण आपल्या अणुप्रकल्पांबाबतची काही माहिती आयोगापासून दडवित असल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे. अणुऊर्जा आयोगाचा सदर अहवाल या अणुकराराशी संबंधित देशांना पुरविण्यात आला आहे. तर इराणने अणुऊर्जा आयोगाच्या अहवालातील हे आरोप फेटाळले आहेत. पण सौदी अरेबियाने अणुऊर्जा आयोगाच्या या अहवालावर चिंता व्यक्त केली असून आंतरराष्ट्रीय समुदायाला इराणविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले.

दरम्यान, अमेरिकेतील निवडणुकीत बिडेन यांच्या विजयानंतर अमेरिका इराणबरोबर नव्याने अणुकरार करील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याची खात्री पटलेल्या इराणने देखील आखाती देशांना धमकावणी दिली होती. मात्र, अणुऊर्जा आयोगाचा हा अहवाल इराणला अडचणीत टाकणारा ठरू शकतो. तसेच या अहवालामुळे अरब-आखाती देशांसह इस्रायलची इराणच्या अणुकार्यक्रमाविरोधातील भूमिका अधिक आक्रमक बनण्याची दाट शक्यता आहे.

leave a reply