इराण आखातात अस्थैर्य माजविणारा देश

- सेंट्रल कमांडच्या प्रमुखांचा इशारा

रियाध – बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी धडपडत असताना, अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा इराणबाबत नवनवे इशारे देत आहेत. ‘इराण हा आखातात अस्थैर्य निर्माण करणारा आघाडीचा देश आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अमेरिका इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ देणार नाही’, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल एरिक कुरीला यांनी बजावले. त्याचबरोबर सौदी अरेबिया, इजिप्त या अमेरिकेच्या मित्रदेशांची भूमिका समजून घेण्यासाठी आपण या देशांना भेट देत असल्याचे जनरल कुरीला यांनी स्पष्ट केले.

गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’ची जबाबदारी स्वीकारणारे जनरल एरिक कुरीला यांनी आखातातील अरब मित्रदेशांचा दौरा सुरू केला आहे. सौदीअरेबियापासून याची सुरुवात केल्यानंतर जनरल कुरीला यांनी युएई आणि इजिप्तला भेट देऊन राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. अणुकरारासाठी आग्रही असलेल्या बायडेन प्रशासनाने इराणबरोबर सुरू केलेल्या वाटाघाटींमुळे अरब मित्रदेश अमेरिकेवर नाराज झाले आहेत.

त्याचबरोबर बायडेन प्रशासनाने सौदीसह आखातातील आपली सैन्यतैनाती कमी केली. तसेच सौदी-युएईच्या राजधानींवर हल्ले चढविणाऱ्या येमेनमधील हौथी बंडखोरांनाही दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळले आहे. बायडेन प्रशासनाची ही भूमिका अरब मित्रदेशांमध्ये अमेरिकेबाबत अविश्वास निर्माण करणारी ठरली आहे.

सौदी अरेबिया व युएईच्या नेत्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या फोनला उत्तर दिले नसल्याचे समोर आले होते. तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन संकटात सापडलेल्या युरोपिय देशांसाठी इंधनाचे उत्पादन वाढविण्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आवाहनही सौदी-युएईने फेटाळले होते. त्यामुळे अमेरिका व अरब देशांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे दावे माध्यमांनी केले होते. युक्रेनमधील युद्ध लांबले असून रशियाने देखील युरोपिय देशांचा इंधन पुरवठा रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.

अशा परिस्थितीत, अरब मित्रदेशांची मनधरणी करण्यासाठी बायडेन प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सेंटकॉमचे प्रमुख जनरल कुरीला यांचा सौदी, युएई व इजिप्त या देशांचा दौरा देखील याचाच एक भाग असल्याचे दिसत आहे. आखाती वृत्तवाहिनीशी बोलताना जनरल कुरीला यांनी इराणला लक्ष्य केले. इराण आखातात अस्थैर्य माजविणारा देश असून अमेरिका इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ देणार नसल्याचे सेंटकॉमचे प्रमुख म्हणाले.

पण पुढच्याच वाक्यात इराणबाबत अमेरिकेला वाटत असलेली चिंता ही या देशाच्या आण्विक सामर्थ्याच्याही पलिकडे असल्याचा दावा जनरल कुरीला यांनी केला. इराणचा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम आणि आखातातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या कारवाया या अमेरिकेच्या चिंतेचे कारण असल्याचे जनरल कुरीला म्हणाले. इराणच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि आखातातील मित्रदेशांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे आवाहन जनरल कुरीला यांनी केले.

पण अमेरिका आणि आखाती देशांमधील संबंधात दूरावा निर्माण झाल्याची कबुली सेंटकॉमच्या प्रमुखांनी अरब वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. आखातातील अमेरिकेच्या वचनबद्धतेबाबत अरब मित्रदेश चिंतित असल्याचे जनरल कुरीला पुढे म्हणाले. त्यामुळे इराणचा धोका अधोरखित करून सेंटकॉमच्या प्रमुखांनी आपल्या आखाती दौऱ्याची सुरुवात केली असली तरी त्याला अरब मित्रदेशांकडून अजूनही तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे.

leave a reply