इराणच्या नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटामागे घातपातच होता

- इराणच्या अणुऊर्जा आयोगाची माहिती

तेहरान – दीड महिन्यांपूर्वी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात झालेला संशयास्पद स्फोट हा घातपातच होता, अशी माहिती इराणच्या अणुऊर्जा आयोगाने दिली. यासाठी इराणने अद्याप कुणालाही जबाबदार धरलेले नाही. पण इराणमधील काही नेते या स्फोटामागे इस्रायल किंवा अमेरिका असल्याचा आरोप करीत आहेत. नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटामुळे इराणचा अणुकार्यक्रम किमान चार वर्षांसाठी पिछाडीवर पडल्याचा दावा केला जातो.

नातांझ

इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोझ कमलवंदी यांनी ‘अल-अलाम’ वृत्तवाहिनीशी बोलताना, नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटामागे घातपात असल्याचे म्हटले आहे. इराणच्या सुरक्षा यंत्रणा लवकरच या स्फोटाचे नेमके कारण उघड करतील, अशी माहिती कमलवंदी यांनी दिली. मात्र ही माहिती कधी घोषित करणार, याबाबत बोलण्याचे कमलवंदी यांनी टाळले. गेल्या दीड महिन्यांपासून इराणमध्ये संशयास्पद स्फोट आणि आगीची मालिका सुरू आहे. २ जुलै रोजी इराणच्या नातांझ येथील अणुप्रकल्पात अचानक आग भडकून मोठा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये प्रगत सेंट्रीफ्यूजेसची निर्मिती करणारे प्रकल्प आणि असेंबली युनिटचे जबर नुकसान झाले होते. या स्फोटाने इराणच्या संपूर्ण अणुकार्यक्रमाला जबर हादरा बसल्याची माहिती समोर आली होती.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी याप्रकरणी इरशाद करिमी या इराणी कंत्राटदाराला जबाबदार धरले होते. सदर अणुप्रकल्पाला आवश्यक साहित्यांचा पुरवठा करणार्‍या करिमी यांनीच स्फोट घडवून आग भडकविल्याचा ठपका रिव्होल्युशनरी गार्डसने ठेवला होता. तर इस्रायल किंवा अमेरिकेने सायबर हल्ला चढवून नातांझमध्ये स्फोट घडविल्याचा आरोप अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला होता. सदर प्रकल्पात बाँब पेरुन हा स्फोट घडविल्याचेही सदर वर्तमानपत्राने म्हटले होते. तर इस्रायलच्या ‘एफ-३५’ या स्टेल्थ लढाऊ विमानांनी नातांझ अणुप्रकल्पावर क्षेपणास्त्र किंवा रॉकेट हल्ल्या चढविल्याचेही बोलले जात होते. पण माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या माहितीवर इस्रायलने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

नातांझ

राजधानी तेहरानपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या नातांझ अणुप्रकल्पात सर्वात मोठी युरेनियम संवर्धनाचे युनिट आहे. या स्फोटाच्या काही दिवस आधी इराणने सदर युनिटमधील युरेनियमचे संवर्धन वाढविण्याची योजना आखली होती. २०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन करुन इराणने युरेनियमचे संवर्धन सुरू करण्याची तयारी सुरू केल्याचा दावा ‘ब्लूमबर्ग’ या अमेरिकी वृत्तसंस्थेने केला होता. पण त्याआधीच सदर प्रकल्पात हा संशयास्पद स्फोट झाल्याचे अमेरिकी वृत्तसंस्थेने लक्षात आणून दिले होते.

दरम्यान, इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कारवाई करण्यासाठी अमेरिकेने नवे निर्बंध लादण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात अमेरिका सदर निर्बंधांचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मांडणार आह. तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांनी इराणच्या अणुप्रकल्पांना भेट देण्याचे जाहीर केले आहे.

leave a reply