तेहरान – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अमेरिका व इस्रायल तसेच परदेशात आश्रय घेतलेल्या इराणी बंडखोरांवर ड्रोन हल्ले चढविणार असल्याचा इशारा दिला आहे. गेल्याच आठवड्यात रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांनी अमेरिका व इस्रायलला धमकावले होते. या पार्श्वभूमीवर सदर व्हिडिओचे गांभीर्य वाढले आहे.
रिव्होल्युशनरी गार्ड्सनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओची सुरुवात इस्रायलच्या तेल अविव शहरावरुन होते. तेल अविव आणि आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळावर सर्वात पहिला ड्रोन हल्ला चढविला जातो, असे या व्हिडिओमध्ये दाखविले आहे. त्यानंतर इराणचे कमांड सेंटर आणि ड्रोन्सचे हँगर यात दाखविण्यात आले. या व्हिडिओची अखेर ड्रोन हल्ल्यांमध्ये बेचिराख झालेल्या अमेरिका व इस्रायलमधील ठिकाणांचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स दाखविण्यात आले आहे.
याद्वारे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी अमेरिका-इस्रायलवरील हल्ल्याची योजना मांडल्याचे दिसत आहे. तर फ्रान्स व इतर युरोपिय देशांमध्ये आश्रय घेतलेले इराणमधील राजवटविरोधातील ‘मुजाहिद्दीन-ए-खल्क’ या गटाच्या बंडखोरांना लक्ष्य करणार असल्याचे आयआरजीसीने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.