तेहरान/वॉशिंग्टन, दि ०३(वृत्तसंस्था)– ‘पर्शियन आखातातील अमेरिकेच्या प्रत्येक हालचालींवर इराणची बारिक नजर आहे. त्यामुळे अमेरिकेने आमच्याविरोधात थोडीही जरी हालचाल केली, तरी या क्षेत्रातील अमेरिकेच्या हितसंबंधांवर तीव्र हल्ले चढवू’, अशी धमकी इराणच्या लष्करप्रमुखांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर इराणने ही धमकी दिली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौका पर्शियन आखातात गस्त घालत आहेत. त्यामुळे इराणच्या या धमकीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे अमेरिकी अधिकार्यांनी म्हटले आहे.
इराण आपल्यावरील कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल मोहम्मद हुसेन बाघेरी यांनी धमकावल्याचे ‘तेहरान टाईम्स’ या स्थानिक वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले. ‘इराणबाबत दुष्ट हेतू बाळगणार्या आणि इराणच्या सुरक्षेला आव्हान देणार्यांवर यापूर्वी झाले नव्हते तेवढे गंभीर हल्ले चढवू’, असा इशारा मेजर जनरल बाघेरी यांनी दिला. त्याचबरोबर इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर झालेले हल्ले हे इराकमधून आलेली प्रतिक्रीया असून, त्याचा इराणशी काही संबंध नसल्याचा दावा बाघेरी यांनी केला होता.
चार दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ले झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. पण चार दिवसांपुर्वी अमेरिकेच्या ‘पॅट्रियॉट’ या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेने हे हल्ले रोखले होते. या हल्ल्यांसाठी इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधील आपल्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यांमागे इराण असल्याचे ठासून सांगितले.
त्याचबरोबर, इराण किंवा इराणसंलग्न गट इराकमधील अमेरिकेचे सैनिक, लष्करी तळ किंवा हितसंबंधांवर भेकडपणे हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. पण ‘इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला तर इराणला जबर किंमत चुकवावी लागेल’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले होते.
इराणच्या कुद्स फोर्सेसचे नवे प्रमुख ब्रिगेडियर जनरल इस्माईल घनी यांनी इराकला छुपी भेट देऊन, तेथील इराणसंलग्न दहशतवादी गटांची बैठक घेतली होती. अमेरिकेच्या लष्करी तळावरील हल्ल्यानंतर घनी यांनी ही भेट दिल्याचे आखाती माध्यमांचे म्हणणे आहे. या भेटीमुळे इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ अधिकच असुरक्षित बनल्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्याचे समोर आले होते.
दरम्यान, इराणच्या अमेरिकाविरोधी हालचालींना उत्तर देण्यासाठी अमेरिकेने पर्शियन आखातात दोन अजस्त्र विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. इराण आपल्या नौदलाच्या ताफ्यातील स्पिडबोट्स आणि पाणबुड्यांचा वापर करुन या युद्धनौकांवर हल्ले चढवू शकतो, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय माध्यमे व विश्लेषक व्यक्त करीत आहेत. इराणच्या लष्करप्रमुखाने दिलेला इशारा देखील हेच संकेत देणारे आहे.