इराणविरोधी आघाडीच्या मुद्यावर इस्रायल, कतारच्या संरक्षणदलप्रमुखांची भेट

- सौदीच्या वृत्तसंस्थेचा दावा

संरक्षणदलप्रमुखांची भेटमनामा – इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख जनरल अविव कोशावी यांनी बाहरिनचा दौरा करून कतारच्या संरक्षणदलप्रमुखांची भेट घेतली. इस्रायल धोरणात्मक सहकारी देशांचे क्षेत्रिय नेटवर्क उभारीत असल्याची घोषणा इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी केली. तर इतर अरब देशांप्रमाणे कतारने देखील इस्रायलबरोबर अब्राहम करारात सहभागी व्हावे, यावर चर्चा पार पडल्याची माहिती सौदीच्या वृत्तसंस्थेने दिली.

गेल्या आठवड्यात इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी बहारिनचा दौरा केला होता. गेल्या दीड महिन्यात बहारिनला भेट देणारे कोशावी हे तिसरे इस्रायली वरिष्ठ अधिकारी ठरतात. गेल्या महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट व त्यानंतर संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी बाहरिनला भेट दिली होती. इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनीही बहारिनच्या वरिष्ठ लष्करी तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांची भेट घेतली.

संरक्षणदलप्रमुखांची भेटपण त्याचबरोबर संरक्षणदलप्रमुख लेफ्नंट जनरल कोशावी यांनी राजधानी मनामामध्ये कतारचे संरक्षणदलप्रमुख जनरल सालेम बिन हमाद बिन मोहम्मद बिन अकील अल नाबित यांची भेट घेतली. सौदीच्या ‘इलाफ’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल व कतारच्या संरक्षणदलप्रमुखांमध्ये आखातातील सुरू घडामोडींवर चर्चा पार पडली.

युएई व बहारिन या अरब देशांप्रमाणे कतारने देखील इस्रायलबरोबर अब्राहम करारात सहभागी व्हावे, असा प्रस्ताव इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी कतारच्या संरक्षणदलप्रमुखांसमोर ठेवला. त्याचबरोबर इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ड्रोन हल्ल्यांपासून स्वत:च्या हितसंबंधांची सुरक्षा करण्यासाठी इस्रायल कतारला सहाय्य करण्यासाठी तयार असल्याचे आश्‍वासनही लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी दिले. याशिवाय इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी कतारमधील अमेरिकन नौदलाच्या सेंट्रल कमांडलाही भेट दिली. दरम्यान, गेल्याच आठवड्यात इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग यांनी तुर्कीचा दौरा केला होता. जवळपास दीड दशकानंतर तुर्की इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करीत आहे. त्यानंतर बहारिनमध्ये इस्रायल व कतारच्या संरक्षणदलप्रमुखांची भेट पार पडली. तुर्की व कतार हे दोघेही इराणचे सहकारी देश मानले जातात. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलने कतारला अब्राहम करारात सहभागी होण्याबाबत दिलेला प्रस्ताव लक्षवेधी ठरतो.

leave a reply