वॉशिंग्टन/टोकिओ/ॲमस्टरडॅम – सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनने वर्चस्व मिळवू नये यासाठी अमेरिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सेमीकंडक्टर क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या इतर देशांशी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे समोर येत असून जपान व नेदरलॅण्डस् या दोन देशांनी अमेरिकेच्या आघाडीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे बायडेन प्रशासन या देशांबरोबर बोलणी करीत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी तैवान, दक्षिण कोरिया, ब्रिटन यासारख्या देशांनी अमेरिकेने सेमीकंडक्टर क्षेत्रातील चीनच्या हालचालींविरोधात घेतलेल्या पुढाकाराला साथ देण्याची भूमिका घेतली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात सुरू केलेले व्यापारयुद्ध गेल्या वर्षभरात अधिकाधिक तीव्र झाले आहे. अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने तंत्रज्ञान क्षेत्रासह इतर प्रमुख क्षेत्रांमधील चिनी कंपन्यांवर बंदी टाकण्यास सुरुवात केली असून चिनी गुंतवणुकीवरही निर्बंध लादण्याचे निर्णय घेतले आहेत. यासाठी प्राधान्य देण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्राचा समावेश आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने चीनच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील कंपन्यांशी निगडीत निर्यातीवर निर्बंध लादल्याची घोषणा केली होती. प्रगत मायक्रोचिप्स बनविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व यंत्रणा जगातील पाच कंपन्यांकडे उपलब्ध आहे. यातील तीन कंपन्या अमेरिकन असून एक जपानी व एक नेदरलॅण्डस्मध्ये आहे. जपानची ‘टोकिओ इलेक्ट्रॉन’ व नेदरलॅण्डस्ची ‘एएसएमएल’ अशी संबंधित कंपन्यांची नावे आहेत. अमेरिकेने ऑक्टोबर महिन्यात टाकलेल्या निर्बंधांमुळे अमेरिकी कंपन्या चीनला तंत्रज्ञान व यंत्रणा देऊ शकणार नाहीत. मात्र इतर कंपन्यांनीही ते पुरवू नये म्हणून अमेरिकेने पावले उचलली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जपान तसेच नेदरलॅण्डस्च्या पंतप्रधानांनी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी सेमीकंडक्टर क्षेत्रातील चीनविरोधी आघाडीबाबत बोलणी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आणि जपान व नेदरलॅण्डस्च्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या चर्चेनंतर तिन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये पुढील बोलणी सुरू असून येत्या काही दिवसात एकमत होऊन कराराची घोषणा होईल, असे सांगण्यात येते. निर्यातीवर टाकण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत आम्ही अमेरिकेसह इतर देशांशी चर्चा करीत आहोत, असे जपानचे व्यापारमंत्री यासुतोशि निशिमोरा यांनी सांगितले. आमचा निर्णय आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आधारलेला असेल, असेही जपानी मंत्र्यांनी नमूद केले. नेदरलॅण्डस्ने या मुद्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. नेदरलॅण्डस्च्या ‘एएसएमएल’ कंपनीने निर्बंधांच्या मुद्यावर चिंता व्यक्त केल्याचा दावा करण्यात येत आहे.
कोरोना साथीच्या काळात जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अमेरिका व युरोपातील आघाडीच्या उद्योगांना जबरदस्त फटका बसला होता. दूरसंचार, वाहन, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण या क्षेत्रातील कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले होते. अनेक कंपन्यांना उत्पादन निर्मिती थांबविणे भाग पडले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी अब्जावधी डॉलर्सच्या सवलतींची घोषणा करीत त्यांना अमेरिकेत उत्पादन सुरू करण्याचे आवाहन केले होते.
अमेरिकेच्या या आवाहनानंतर सेमीकंडक्टर क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी अमेरिकेत नव्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. सेमीकंडक्टर क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ने अमेरिकेत तब्बल 40 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे.‘टीएसएमसी’च्या अमेरिकेतील गुंतवणुकीला चीन-तैवानमध्ये भडकणाऱ्या संभाव्य संघर्षाचीही पार्श्वभूमी आहे. पुढील काही वर्षात चीन तैवानवर हल्ला करेल, असे इशारे सातत्याने देण्यात येत आहेत. या हल्ल्याचा सर्वाधिक फटका सेमीकंडक्टर क्षेत्राला बसू शकतो. त्यामुळे अमेरिकेबरोबरच युरोपिय देशांनीही सेमीकंडक्टर्सची निर्मिती स्वदेशात व्हावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधाविरोधात चीनने जागतिक व्यापार संघटनेत तक्रारही दाखल केली आहे. मात्र अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष करीत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.