अथेन्स/नवी दिल्ली – गेल्या काही वर्षात घट्ट होत असलेल्या तुर्की-पाकिस्तान आघाडीला शह देण्यासाठी ग्रीसने भारताबरोबर असलेले सहकार्य अधिक दृढ करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्याच महिन्यात ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या राजदूतांची भेट घेऊन संरक्षणक्षेत्रातील संभाव्य भागीदारीबाबत चर्चा केली. त्यापाठोपाठ भारत व ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यामध्ये व्हर्च्युअल बैठकही पार पडली असून, त्यात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याच्या मुद्यावर बोलणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या भूमध्य सागरी क्षेत्रात ग्रीस व तुर्कीमध्ये जबरदस्त तणाव असून संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रीसने भारताबरोबरील संबंध मजबूत करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे ठरते.
गेल्या काही वर्षात तुर्की व पाकिस्तानमधील सामरिक सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तुर्की व पाकिस्तानमध्ये विनाशिकांसाठी करार झाला असून, संयुक्तरित्या ड्रोन्स तसेच लढाऊ विमान विकसित करण्यावरही एकमत झाले आहे. काही वर्षांपूर्वी तुर्कीने पाकिस्तानला ‘एफ-१६’ विमानांच्या आधुनिकीकरणासाठीही सहाय्य पुरविले होते. गेल्या वर्षीच भूमध्य सागर व अरबी समुद्रात दोन्ही देशांचा संयुक्त नौदल सरावही पार पडला होता. तुर्कीत झालेल्या अपयशी बंडानंतर, पाकिस्तानचे अनेक वैमानिक तुर्की हवाईदलात काम करीत असून पाकिस्तानने तुर्कीला ‘ट्रेनिंग जेट्स’देखील पुरविली आहेत. ‘आर्मेनिया-अझरबैजान’ युद्धात, पाकिस्तानने तुर्कीच्या आवाहनावरून आपले लष्करी पथक पाठविल्याचेही उघड झाले आहे.
तुर्की व पाकिस्तानमधील ही जवळीक ग्रीसच्या चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे त्याला शह देण्यासाठी ग्रीसने भारताबरोबरील संबंध दृढ करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत व ग्रीसमध्ये राजनैतिक पातळीवर चांगले सहकार्य असले तरी ते वाढविण्यासाठी यापूर्वी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे आता ग्रीसकडून घेण्यात आलेला पुढाकार लक्ष वेधून घेणारा ठरतो. अवघ्या १० दिवसांच्या अवधीत ग्रीसच्या संरक्षण व परराष्ट्रमंत्र्यांनी भारताशी चर्चा केली आहे. यावेळी ग्रीक संरक्षणमंत्र्यांनी भारताबरोबर संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य विकसित होऊ शकते, असे संकेतही दिले. ग्रीसमधील विश्लेषकांनी, तुर्की बरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला भूमध्य सागरी क्षेत्रात संयुक्त नौदल सरावासाठी निमंत्रण द्यावे, अशीही मागणी केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, ग्रीसबरोबर झालेल्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना, भारतही ग्रीसबरोबर व्यापार, तंत्रज्ञान व सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य वाढवून संबंध मजबूत करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ग्रीसबरोबर पार पडलेल्या बैठकीनंतर झालेल्या एका कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, युरोप हा भारतासाठी नैसर्गिक भागीदार असल्याचे वक्तव्य केले आहे. युरोपमधील मोठ्या व प्रमुख देशांबरोबरच इतर देशांशीही भारत दृढ संबंध विकसित करेल, असेही परराष्ट्रमंत्री म्हणाले. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला सध्या युरोप दौऱ्यावर असून, या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेले विधान महत्त्वाचे ठरते.