अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन भारतात दाखल

नवी दिल्ली – अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन भारताच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी लॉईड ऑस्टिन यांची चर्चा पार पडणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी क्वाड देशांच्या व्हर्च्युअल बैठकीसाठी पुढकार घेतल्यानंतर, संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांचा हा भारत दौरा उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनची आक्रमकता अधिकाधिक वाढत असताना, भारत व अमेरिकेमधील संरक्षणविषयक सहकार्य भक्कम करण्यासाठी संरक्षणमंत्री ऑस्टिन भारतात दाखल झाल्याचे सांगितले जाते. चीनबरोबरील एलएसीवरील तणावानंतर भारताने शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या खरेदीसाठी झपाट्याने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून भारत अत्याधुनिक ड्रोन्स खरेदी करणार आहे. तर अमेरिका भारताला लढाऊ विमाने पुरविण्यासाठी उत्सुक आहे. भारत ११४ लढाऊ विमाने खरेदी करणार असून लॉकहीड मार्टिन आणि बोईंग या अमेरिकन कंपन्या हे कंत्राट मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेचे संरक्षणमंत्री आपल्या या दौर्‍यात भारताकडून नवी कंत्राटे मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, अशी दाट शक्यता वर्तविली जाते.

याआधी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी जपान व दक्षिण कोरियाला भेट दिली होती. त्यानंतर ते भारतात दाखल झाले असून त्यांच्या या आशिया दौर्‍याचे लक्ष्य चीन असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकेच्या मित्रदेशांबरोबरील लष्करी सहकार्य वाढवून चीनच्या विरोधात विश्‍वासर्ह आघाडी उघडण्याची घोषणा संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केली होती. गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जपान तसेच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची व्हर्च्युअल बैठक पार पडली होती. या बैठकीत इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे स्थैर्य, शांतता यासाठी सहकार्य करण्याचे चारही नेत्यांनी मान्य केले होते. या क्षेत्रात विस्तारवादी कारवाया करणार्‍या चीनला इशारा देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा जगभरातील माध्यमसृष्टीमध्ये सुरू होती.

याद्वारे दोन महिन्यांपूर्वी सत्तासूत्रे हाती घेणारे अमेरिकेचे बायडेन प्रशासन देखील चीनच्या विस्तारवादी धोरणांच्या विरोधात असेल, असा संदेश दिला जात आहे. असे असले तरी भारताने बायडेन प्रशासनाबाबत सावधानता दाखविण्याची आवश्यकता असल्याचे काही विश्‍लेषक वारंवार बजावत आहेत. बायडेन प्रशासनाचा चीनला असलेला विरोध केवळ शाब्दिक पातळीपुरता मर्यादित असेल का, याची खात्री भारताने करून घ्यावी, असा सल्ला हे विश्‍लेषक भारताला देत आहेत.

संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्या भारत दौर्‍याच्या आधी अमेरिकेचे काही सिनेटर्स रशियाकडून एस-४००ची खरेदी करणार्‍या भारताला निर्बंधांच्या धमक्या देण्याची मागणी करीत आहेत. तर मानवाधिकारांच्या मुद्यावर ऑस्टिन भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतील, असे दावे माध्यमांनी सुरू केले आहेत. अद्याप अधिकृत पातळीवर अमेरिकेने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण वाटाघाटीत कुरघोडी करण्यासाठी व भारतावर दबाव टाकण्यासाठी अमेरिकेचे संरक्षणमंत्री ‘एस-४००’चा मुद्दा उपस्थित करू शकतात. मात्र त्याचा लाभ मिळण्याच्या ऐवजी याने अमेरिकेचे नुकसान होऊ शकते, याकडे काही मुत्सद्यांनी लक्ष वेधले होते.

leave a reply