जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या चार लाखांवर

बाल्टिमोर – जगभरात कोरोनाचा साथीमुळे दगावणाऱ्यांची संख्या चार लाखांवर गेली असून त्यात अमेरिकेतील सुमारे एक लाख १० हजार जणांचा समावेश आहे, अशी माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिली. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये जगभरात गेल्या २४ तासात एक लाखांहून अधिक रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ७० लाखांवर जाऊन पोहोचली आहे. साथीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असला तरी सध्या लॅटिन अमेरिका, आशिया व आखातात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे.

कोरोना साथीचा उद्रेक अजूनही कमी होत नसून उलट दर दिवशी नवनवीन देश ‘हॉटस्पॉट’ म्हणून समोर येत आहेत. गेल्या २४ तासांत जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत १,१३,८२८ जणांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ७०,२७,१९१ झाल्याची माहिती ‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिली आहे. एकूण बळींची संख्या ४,०३,०८० झाली असून २४ तासांत ३,१८३ जणांचे बळी गेले आहेत.

अमेरिकेतील रुग्णांची संख्या १९,२२,०५४ असून बळींची एकूण सख्या १,०९,८४६ वर गेल्याची माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिली. गेल्या २४ तसांत अमेरिकेत एक हजारांहून अधिक नव्या बळींची नोंद झाली आहे. ब्राझिलमध्ये रुग्णांची संखया ६,७२,८४६ झाली असून सुमारे ३६ हजार दगावले आहेत. ब्राझीलपाठोपाठ मेक्सिकोतील बळींची संख्या १३ हजारांवर गेली असून लॅटिन अमेरिकेतील बळींची संख्या ६० हजारांवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

सौदी अरेबियातील कोरोना रुग्णांनी एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी इराण व तुर्कीतील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांवर गेली होती. इराणमध्ये आठ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून तुर्कीतील बळीची संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. सौदी अरेबियातील बळींची संख्या ७१२ असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply