ब्रिटनमध्ये मोठ्या निदर्शनांचे आयोजन

लंडन – बिटिश पोलिसांच्या अधिकारांमध्ये होणारी वाढ, गुन्हेगारीविरोधातील कायदे आणि इतर मुद्यांचा विरोध करण्यासाठी ब्रिटनमध्ये ४० हून अधिक ठिकाणी निदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘किल दी बिल’ अंतर्गत होणारी ही निदर्शने देशातील जॉन्सन यांच्या हुकूमशाही सरकारविरोधात असल्याची टीका निदर्शकांकडून केली जाते. तर ब्रिटनमध्ये अस्थैर्य, अराजक माजविण्यासाठी काही गटांनी या निदर्शनांचे आयोजन केल्याचा आरोप सरकार समर्थकांकडून केला जातो.

ब्रिटनच्या संसदेत पोलिसांचे अधिकार वाढविणारे विधेयक सादर करण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातील गुन्हेगारांवरील कारवाई संबंधीचे कायदे अधिक कठोर करण्यावरही ब्रिटनच्या संसदेत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे तुकडे करण्यासाठी काही गट कार्यरत असून त्यांना रोखण्यासाठी हे कायदे करणे आवश्यक असल्याचे जॉन्सन सरकारचे म्हणणे आहे. यामुळे देशात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होईल, असा दावा ब्रिटनचे सरकार करीत आहे.

पण सदर कायदे संमत झाले तर आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावून बसू, असे निदर्शनांचे आयोजन करणार्‍या गटांचे आणि त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. म्हणून या कायद्यांना विरोध करण्यासाठी शनिवारी ब्रिटनच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनच्या त्रफालगार चौकात सुमारे पाच हजार निदर्शक जमले होते. लंडन पोलिसांनी या निदर्शकांवर कारवाई केल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या महिन्यातही ब्रिटनमध्ये अशाच प्रकारच्या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.

leave a reply