नवी दिल्ली – ‘कोरोनाव्हायरसच्या साथीवर लस सापडत नाही किंवा यावर प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपचार सापडत नाही, तोपर्यंत या विषाणूच्या सहाय्याने लष्करावर जैविक हल्ले चढविले जाण्याची शक्यता फेटाळता येणार नाही’, असा इशारा भारतीय लष्कराच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनुप चटर्जी यांनी यांनी दिला. काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षणदल प्रमूख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तान कोरोनाग्रस्त दहशतवाद्यांना भारतात घुसवून जैविक हल्ला चढविल, असे बजावले होते.
भारतासह अमेरिका, इस्रायल, ब्रिटन व काही आघाडीच्या देशांनी या साथीवर लस शोधण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. पण कोरोनाव्हायरसच्या साथीवर अजूनही समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. भारतीय लष्कराच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनुप चटर्जी यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ‘शत्रूदेशाकडून लष्करावर कोरोनाव्हायरसचा शस्त्रासारखा वापर होईल, असे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण या साथीवर लस मिळविणे किंवा प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपचार सापडणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या विषाणूचा शस्त्रासारखा वापर करुन लष्करावर हल्ला चढविला जाण्याची शक्यता नाकारत येत नाही’, असे लेफ्टनंट जनरल चटर्जी यांनी बजावले.
पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याच्या प्रयत्नात असल्याचे इशारे दिले जात आहेत. या दहशतवाद्यांमध्ये कोरोनाग्रस्त दहशतवादी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारताचे संरक्षणदलप्रमूख जनरल बिपीन रावत यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतचा इशारा दिला आहे. पाकिस्तानला भारतात दहशतवाद पसरवायचा आहे. यासाठी ते दहशतवादी किंवा कोरोनाचाही वापर करू शकतात’, असे जनरल रावत यांनी बजावले होते. या पार्श्वभूमीवर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या इशाराचे महत्त्व वाढले आहे.
दरम्यान, कोरोनाव्हायरस सारख्या जैविक तसेच आण्विक, रासायनिक हल्ल्याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराच्या तीनही दलांची तयारी असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.