अमेरिकेच्या सीमांमध्ये घुसणारे निर्वासित नव्या संकटांना आमंत्रण देणारे

- अ‍ॅरिझोना राज्यातील मेयरचा इशारा

वॉशिंग्टन – ‘‘‘अमेरिका-मेक्सिको सीमेवरून घुसणार्‍या निर्वासितांची आरोग्यविषयक तसेच इतर वैयक्तिक माहिती अद्यापही स्थानिक प्रशासनाला पुरविण्यात आलेली नाही. हे असेच कायम राहिले तर ही गोष्ट अमेरिकी नागरिकांसाठी ज्यातून काय बाहेर येईल याची कल्पनाही करता येणार नाही असा ‘पँडोराज् बॉक्स’ ठरेल’’, असा गंभीर इशारा अ‍ॅरिझोना प्रांतातील ‘गिला बेंड’ या शहराचे मेयर ख्रिस रिग्ज यांनी दिला. अमेरिकेच्या सीमासुरक्षा दलांनीही मेक्सिको सीमेतून घुसणार्‍या निर्वासितांची समस्या तीव्र झाल्याचे बजावले आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांविरोधात राबविलेले धोरण अमेरिकेला काळिमा फासणारे असल्याचा दावा करून, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे वटहुकूम जारी केले होते. २० जानेवारीला सूत्रे हाती घेतल्यानंतर बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जारी केलेला ‘ट्रॅव्हल बॅन’ तसेच ‘मेक्सिको वॉल प्रोजेक्ट’ तातडीने रद्द केला होता. तसेच नव्या वटहुकुमांमुळे, मध्य अमेरिकेतून अमेरिकेत दाखल झालेल्या बेकायदा निर्वासितांना आपल्या मुलांना अमेरिकेत आणण्याची संधी मिळाली होती.

त्याचवेळी अमेरिकेत येणार्‍या अवैध निर्वासितांच्या लोंढ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात एक लाखांहून अधिक जणांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. जानेवारी महिन्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल २८ टक्के असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. या निर्वासितांसंदर्भात योग्य कायदेशीर प्रक्रिया राबविण्यासाठी तसेच त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी बायडेन प्रशासनाने कोणत्याही ठोस तरतुदी केलेल्या नाहीत. त्यामुळे अमेरिका-मेक्सिको सीमेवरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

अ‍ॅरिझोना राज्यातील मेयरनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो. अ‍ॅरिझोनाबरोबरच टेक्सास व इतर राज्यांमधील प्रशासनांकडूनही बायडेन यांना धारेवर धरण्यात येत असून योग्य व्यवस्था नसताना निर्णय घेतल्याची टीका करण्यात येत आहे. अमेरिकेतील सीमांची जबाबदारी असणार्‍या ‘नॅशनल बॉर्डर पेट्रोल कौन्सिल’नेही राष्ट्राध्यक्षांकडून घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ‘सीमेवर निर्माण झालेली परिस्थिती मोठी समस्या आहे, असे गेल्या आठवड्यात वाटत नव्हते. मात्र आता सीमेवरील निर्वासितांचे लोंढे हे मोठे संकट ठरते आहे. सीमेवर तैनात यंत्रणांकडे त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक स्रोतही उपलब्ध नाही’, अशा शब्दात ‘नॅशनल बॉर्डर पेट्रोल कौन्सिल’चे प्रमुख ब्रँडन ज्युड यांनी बायडेन प्रशासनाला फटकारले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर अराजकसदृश स्थिती निर्माण झाल्याचे बजावले होते.

leave a reply