फ्रँकफर्ट/मॉस्को – रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन अमेरिका व युरोपमधील बँकांविरोधात मोठा सायबरहल्ला चढविण्याचे निर्देश देतील, असा इशारा पाश्चात्य यंत्रणांनी दिला आहे. रशियाच्या या सायबरहल्ल्यांमुळे जगभरात आर्थिक अराजकाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा दावाही काही माध्यमांकडून करण्यात आला. गेल्याच महिन्यात युक्रेन सरकारच्या अनेक वेबसाईट्सवर मोठा सायबरहल्ला झाल्याचे समोर आले होते. यामागे रशियाचा हात असल्याचे सांगण्यात आले होते.
यापूर्वी २०१५, २०१७ तसेच २०२० साली आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या काही प्रमुख सायबरहल्ल्यांमागे रशियन हॅकर्सच्या गटाचा हात असल्याचे समोर आले होते. २०२० साली अमेरिकेतील ‘फायर आय’ व ‘सोलरविंड्स’ या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर झालेला सायबरहल्ला यातील सर्वात मोठा हल्ला मानला जातो. या सायबरहल्ल्याविरोधात कारवाई म्हणून अमेरिकेने रशियावर निर्बंध लादून राजनैतिक अधिकार्यांची हकालपट्टी केली होती.
या पार्श्वभूमीवर नव्या सायबरहल्ल्याबाबत व्यक्त करण्यात आलेली शक्यता लक्ष वेधून घेणारी ठरते. सध्या रशिया-युक्रेन मुद्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त तणाव आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी अमेरिका, युरोप व नाटोकडून सुरू आहे. रशियाला जबर निर्बंधांना तोंड द्यावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. हे लक्षात घेता रशिया पाश्चात्य देशांना हादरा देण्यासाठी सायबरहल्ल्यांचा पर्याय वापरू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
युरोपमधील मध्यवर्ती बँक असणार्या ‘युरोपियन सेंट्रल बँके’सह अमेरिका, ब्रिटन व जर्मनीमधील यंत्रणांनी यासंदर्भात इशारे तसेच अलर्ट जारी केले आहेत. युरोपियन सेंट्रल बँकेने आपल्या अधिकारक्षेत्रातील बँकांना ‘सायबर वॉरगेम्स’चा सराव करण्याची सूचना केली आहे. ‘न्यूयॉर्क डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस’ने जानेवारीच्या अखेरीस सायबरहल्ल्याबाबत अलर्ट जारी केला आहे. ब्रिटनच्या ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’ने मोठ्या कंपन्यांना सायबरसुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याबाबत बजावले आहे. तर जर्मनीतील ‘बाफिन’ यंत्रणेचे प्रमुख मार्क ब्रॅन्सन यांनी, भूराजकीय स्थिती व सुरक्षा यांचा सायबरयुद्धाशी संबंध असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे.