मॉस्को – रशियन सरकारकडे असलेल्या राखीव गंगाजळीतून उभारण्यात आलेल्या ‘नॅशनल वेल्थ फंड’ला सोन्यात गुंतवणूक करण्यास मंजुरी मिळाली. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. आर्थिक संकटाच्या काळात तूट भरून काढण्यासाठी व इतर संबंधित उपाययोजनांसाठी ‘नॅशनल वेल्थ फंड’ची उभारणी करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘नॅशनल वेल्थ फंड’मध्ये 184 अब्ज डॉलर्स इतका निधी आहे.
‘नॅशनल वेल्थ फंडमधील राखीव निधी बँक ऑफ रशियाच्या माध्यमातून, पारंपारिकदृष्ट्या सुरक्षित मालमत्ता म्हणून ओळखण्यात येणार्या सोन्यातील गुंतवणुकीसाठी वापरला जाऊ शकतो’, असे पंतप्रधान मिशुस्तिन यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. फंडाच्या गुंतवणुकीसाठी अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत व त्याचवेळी ती सुरक्षित रहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भातील प्रस्ताव गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या काही वर्षात अमेरिकी डॉलरचा वापर कमी करण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. त्यासाठीच धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बाब म्हणून सोन्याकडे लक्ष पुरविले आहे. देशातील सोन्याचे उत्पादन व निर्यात वाढविणे आणि राखीव साठे यावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. या धोरणाला यश मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
रशियाकडील सोन्याचे राखीव साठे 2,298 टनांवर जाऊन पोहोचले आहेत. 2014 साली हेच प्रमाण 1,112 टन इतके होते. रशियाकडील परकीय गंगाजळी 590 अब्ज डॉलर्सवर गेली असून त्यातील सोन्याचे मूल्य तब्बल 130 अब्ज डॉलर्स इतके आहे. गंगाजळीतील सोन्याची टक्केवारी 22 टक्क्यांवर गेली असून, रशियन इतिहासात प्रथमच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सोन्याची टक्केवारी वाढली आहे.
त्याचवेळी रशियातील सोन्याचे उत्पादन व निर्यातही वेगाने वाढत असल्याचे समोर येत आहे. सोन्याचे सर्वाधिक उत्पादन घेणार्या जगातील 10 प्रमुख कंपन्यांपैकी तीन कंपन्या रशियन आहेत. 2020 साली रशियाने सोन्याचे 331 टन इतके उत्पादन केले असून, तो जगातील दुसर्या क्रमांकाचा उत्पादक देश ठरला आहे. येत्या दशकभरात रशिया चीनला पिछाडीवर टाकून जगातील पहिल्या क्रमांकाचा सोन्याचा उत्पादक बनेल, असा दावा ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिओटेक्नॉलॉजिज्’ या कंपनीने केला आहे.
दरम्यान, रशियाने सोन्याची निर्यातही वाढविली असून, या वर्षाच्या पहिल्या तिमाहित 51.8 टन सोन्याची निर्यात केल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 72 टक्के इतकी आहे. ब्रिटन हा सर्वात मोठा खरेदीदार देश ठरला आहे. या देशाने रशियातून 21 टनांहून अधिक सोने खरेदी केल्याचे समोर आले आहे.