रशिया भारताला अल्पावधीत लढाऊ विमाने पुरविण्यास तयार

नवी दिल्ली – भारत आणि चीनमध्ये कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल ही स्थिती असताना रशियाने भारताला १२ ‘सुखोई-३०एमकेआय’ आणि २१ ‘मिग-२९’ अशी ३३ विमाने अल्पावधीत पुरविण्याची तयारी दाखवली आहे. या दृष्टीने रशियाने तयारीही सुरु केल्याच्या बातम्या आहेत. भारताचे संरक्षणमंत्री सोमवारपासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जात असून या पार्श्वभूमीवर रशियातील वरिष्ठ पातळीवरील सूत्रांच्या हवाल्याने या बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

Russia-Indiaसोव्हिएत रशियाने दुसऱ्या महायुद्धात मिळविलेल्या विजयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २४ जून रोजी रशियात विजय दिनाचा विशेष समारोह आयोजित केला आहे. या समारोहासाठी रशियाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना आमंत्रित केले होते. भारताने हे निमंत्रण स्वीकारले असून चीनबरोबरील सीमेवर प्रचंड तणाव असतानाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. ”रशियाचा धोरणात्मक भागीदार असलेल्या भारताच्या संरक्षणमंत्र्यांची रशिया भेट फलदायी होवो’, अशा शब्दात रशियाचे राजदूत निकोलाय कुदाशेव्ह यांनी राजनाथ सिंग यांच्या रशिया दौऱ्याची माहिती जाहीर केली. २४ जून रोजी होणाऱ्या भव्य संचलनात भारताच्या तीनही संरक्षणदलांचे जवान सहभागी होणार आहेत. यातून भारत आणि रशिया सहकार्य भक्कम असल्याचे संकेत रशिया देत आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा रशिया दौरा सुरु होत असताना रशिया भारताला शक्य तितक्या लवकर विमानांचा पुरवठ्यासाठी तयार असल्याच्या बातम्या येत आहेत. १२ ‘सुखोई-३०एमकेआय’ आणि २१ ‘मिग-२९’ विमाने खरेदी करण्याच्या वायुसेनेच्या या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. मात्र चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेला वेग देण्यात आल्याच्या बातम्या होत्या. त्यामध्ये दोन सरकारमध्ये करार झाल्यास जेवढ्या शक्य तितक्या लवकर ही विमाने भारताला पुरविण्याची रशियाने तयारी केल्याचे बातमी रशियातील वरिष्ठ पातळीवरील सूत्रांच्या हवाल्याने येत आहे.

leave a reply