मॉस्को – अमेरिका व मित्रदेशांकडून लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधांना प्रत्युत्तर देण्याची तयारी रशियाने सुरू केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एका वटहुकुमावर स्वाक्षरी केली असून त्याद्वारे महत्त्वाच्या व संवेदनशील रशियन उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येणार आहे. रशियाच्या परराष्ट्र विभागानेही संभाव्य निर्बंधांचे संकेत दिले असून पाश्चिमात्य देशांच्या महत्त्वाच्या क्षेत्रांना हादरा देणारी कारवाई करु, असे बजावले आहे.
युक्रेनवरील हल्ल्याच्या मुद्यावरून पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या इंधनक्षेत्रासह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये निर्बंध लादले आहेत. रशियावर टाकलेल्या या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था मोठ्या संकटात असून ‘सोव्हिएत रशिया’च्या विघटनानंतरचे हे सर्वात मोठे आर्थिक संकट असल्याचा दावा करण्यात येतो. रशियाने या निर्बंधांची तीव्रता कमी करण्यासाठी पावले उचलली असली तरी अद्यापही त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर रशियाने आता पाश्चिमात्य देशांना आर्थिक पातळीवर दणका देण्याची तयारी सुरू केली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी रात्री एका विशेष वटहुकुमावर स्वाक्षरी केली आहे. त्यात, रशियात निर्मिती होणार्या महत्त्वाच्या व संवेदनशील उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात कच्चा माल तसेच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असू शकतो, असे सूत्रांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसात रशियाकडून निर्यातीवर बंदी घातलेल्या गोष्टींची यादी जाहीर करण्यात येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
रशियाच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिमित्रि बिरीशेव्हस्की यांनी रशियाकडून करण्यात येणार्या संभाव्य कारवाईला दुजोरा दिला आहे. ‘रशिया पूर्णपणे विचार करून संवेदनशील क्षेत्रांमध्ये निर्बंध लादेल व त्याची तातडीने अंमलबजावणी होईल. ही कारवाई पाश्चिमात्य देशांना धक्का देणारी असेल’, असे बिरीशेव्हस्की यांनी बजावले.
अन्नधान्य तसेच पॅलाडियम, निकेल, ऍल्युमिनिअम या धातूंच्या उत्पादनात रशिया हा आघाडीचा देश मानला जातो. या सर्वांचे दर आधीच विक्रमी स्तरावर असून रशियाने या गोष्टींची निर्यात थांबविल्यास जागतिक स्तरावर महागाईचा भडका उडू शकतो. याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासावरही होऊ शकतात, असा दावा विश्लेषकांकडून यापूर्वीच करण्यात आला आहे.