मॉस्को/वॉशिंग्टन – युक्रेनच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या मुद्यावर रशियावर आक्रमक निर्बंध टाकण्याचा इशारा अमेरिका व मित्रदेशांनी दिला आहे. रशियाला धक्का देणारे हे निर्बंध प्रत्यक्षात अमेरिका व मित्रदेशांवरच ‘बूमरँग`सारखे उलटू शकतील, असा दावा विश्लेषक व माध्यमांकडून करण्यात येत आहे. रशियावर लादलेल्या निर्बंधांचा फटका अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला बसू शकतो, असे अमेरिकेतील विश्लेषकांनी बजावले आहे. युक्रेनच्या मुद्यावरून अमेरिकेने रशियावर निर्बंध लादल्यास ती अमेरिकेची घोडचूक ठरेल व त्यामुळे दोन देशांमधील संबंध कायमचे बिघडतील, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यापूर्वीच दिला आहे.
येत्या दोन दिवसात रशिया आणि अमेरिका व मित्रदेशांमध्ये युक्रेनसह अनेक मुद्यांवर व्यापक चर्चा होणार आहे. या चर्चेपूवी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमकी सुरू असून अमेरिका, नाटो व युरोपिय देशांकडून रशियाला सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. अमेरिका तसेच युरोपिय देशांनी रशियावर जबर निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. यात रशियाची इंधनकंपनी ‘गाझप्रोम`, रशियाची मध्यवर्ती बँक तसेच हवाईक्षेत्र व स्मार्टफोन निर्यातीवरील निर्बंधांचा समावेश असेल, असे सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहारांसाठी सक्रिय असणाऱ्या ‘स्विफ्ट` या यंत्रणेतून रशियाची हकालपट्टी करण्याचे दावेही करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर अमेरिका व युरोपमधील काही विश्लेषक रशियावरील निर्बंधांबाबत सावधगिरीचा इशारा देत आहेत. रशियावर निर्बंध लादल्यास त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत उमटतील, असा दावा अमेरिकी प्रशासनातील सूत्रांनी केला. जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या किमती भडकतील आणि युरोपचा व्यापार व गुंतवणुकीला मोठे धक्के बसतील, असे सूत्रांनी बजावले आहे. अमेरिका व युरोपमधील महत्त्वाच्या क्षेत्रांवर मोठे सायबरहल्ले होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
यापूर्वी अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी क्रिमिआ, सायबरहल्ले, ॲलेक्सी नॅव्हॅल्नीवरील कारवाई, हेरगिरी तसेच विषप्रयोगाचा कट यासारख्या मुद्यांवरून रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. रशियाला या निर्बंधांचा फटका बसला असला तरी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अर्थव्यवस्था सावरण्यात यश मिळविले होते. पुढील काळात निर्बंधांमुळे मोठी हानी सहन करावी लागू नये म्हणून अमेरिकी डॉलरवरील अवलंबित्व कमी करणारी आक्रमक धोरणे रशियाने स्वीकारली आहेत.