वॉशिंग्टन/लंडन – रशियन अर्थव्यवस्थेतील सर्व प्रमुख क्षेत्रांवर निर्बंध लादणार्या पाश्चिमात्य देशांनी आता आपले लक्ष रशियाकडे असलेल्या सोन्याच्या राखीव साठ्यांकडे वळवले आहे. अमेरिका व ब्रिटन या दोन्ही देशांसह ‘जी७’ गटाने रशियातील सोन्याच्या राखीव साठ्यांवर निर्बंध लादणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, रशियाच्या मध्यवर्ती बँकेबरोबर सोन्यासंदर्भात व्यवहार करणार्या व्यक्ती व कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंधांचा मारा चालविला आहे. निर्बंधांमुळे रशियन अर्थव्यवस्थेची हानी होईल व राष्ट्राध्यक्ष पुतिन युद्ध पुढे चालवू शकणार नाहीत, असे कारण या निर्बंधांसाठी पुढे करण्यात आले आहे. या कठोर निर्बंधांअंतर्गत रशियाची मध्यवर्ती बँक, परकीय गंगाजळी तसेच ‘स्विफ्ट’ यंत्रणेच्या माध्यमातून होणार्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र यात आतापर्यंत सोन्याचा समावेश करण्यात आला नव्हता. पण रशियन राष्ट्राध्यक्ष त्याचा वापर करु शकतात, असा दावा करून आता रशियातील सोन्याच्या राखीव साठ्यांनाही लक्ष्य करण्याची तयारी सुरू झाली आहे.
.अमेरिकेच्या संसदेत काही दिवसांपूर्वीच ‘स्टॉप रशियन गोल्ड’ नावाचे विधेयक सादर करण्यात आले आहे. आता अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलन यांनीही या मुद्यावर संसदेतील वरिष्ठ सदस्यांशी तसेच अधिकार्यांशी चर्चा सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन त्यांच्याकडे असलेले सोन्याचे प्रचंड साठे वापरून अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करु शकतात. या साठ्यांना लक्ष्य करून आपण रशियाला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेपासून अधिक एकटे पाडू शकतो’, असा दावा अमेरिकेतील सिनेटर ऍन्गस किंग यांनी केला.
अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही रशियन सोन्यावर निर्बंधांचे समर्थन केले. ‘रशियाकडे असलेल्या परकीय गंगाजळीतील निधीबरोबर सोन्याच्या साठ्यांनाही लक्ष्य करता येऊ शकते. दबाव जेवढा वाढविता येईल, तेवढ्या प्रमाणात युद्धाचा कालावधी कमी करता येऊ शकेल. पुतिन यांच्याभोवतालचा आर्थिक फास आवळायला हवा’, असे पंतप्रधान जॉन्सन यांनी बजावले. अमेरिकेतील विधेयक व जॉन्सन यांच्या या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर ब्रुसेल्समध्ये झालेल्या ‘जी७’ गटाच्या बैठकीत रशियाकडील सोन्याच्या राखीव साठ्यांवर निर्बंध टाकण्यावर एकमत झाल्याचे वृत्त आहे.
रशियाकडे सोन्याचे राखीव साठे २,२९६ टनांवर असल्याचे सांगण्यात येते. तर रशियाकडील परकीय गंगाजळी ६०० अब्ज डॉलर्सहून अधिक असून त्यातील सोन्याचे मूल्य तब्बल १३२ अब्ज डॉलर्स इतके आहे. गंगाजळीतील सोन्याची टक्केवारी २२ टक्क्यांवर गेली आहे. रशियातील सोन्याचे उत्पादनही वेगाने वाढत असल्याचे समोर येत आहे. सोन्याचे सर्वाधिक उत्पादन घेणार्या जगातील १० प्रमुख कंपन्यांपैकी तीन कंपन्या रशियन आहेत. २०२० साली रशियाने सोन्याचे ३३१ टन इतके उत्पादन केले असून तो जगातील दुसर्या क्रमांकाचा उत्पादक देश ठरला होता.