कॅनबेरा – ऑस्ट्रेलियन उत्पादनांवर बहिष्काराची धमकी देणाऱ्या चीनला ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्र्यांनी चांगलेच फटकारले आहे. जागतिक सहकार्याची मागणी करणाऱ्या देशावर बहिष्काराची धमकी देण्याच्या वक्तव्याचा आम्ही धिक्कार करतो, असे परराष्ट्रमंत्री मारिस पेन यांनी चीनला बजावले. ऑस्ट्रेलियाने कोरोनव्हायरस प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. त्यावर चीनने हटवादी भूमिका घेतली असून ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्यास सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्यात कोरोनव्हायरसचे मूळ व त्याचा फैलाव याचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी केली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व सदस्य देशांनी या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ऑस्ट्रेलियाने केले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या या मागणीने चीन खवळल्याचे समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या आधी अमेरिका व ब्रिटन या देशांनी अशाच प्रकारची मागणी केली होती. ऑस्ट्रेलियाने त्यांची ही मागणी उचलून धरल्याचे दिसत आहे. आपल्याविरोधात सूर लावणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश झाल्याने चीनकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित होती.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलियाच्या मागणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीन हा कोरोनाव्हायरसची माहिती देणारा पहिला देश होता, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने दिली. काही देश चौकशीबाबत फारच आग्रही भूमिका घेताना दिसत आहेत; पण त्यामागील राजकीय खेळी कधीच यशस्वी होणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून बजावण्यात आले.
त्याचवेळी चीनचे ऑस्ट्रेलियातील राजदूत शेंग जिंगये यांनी, आर्थिक बहिष्काराची धमकी दिली. ‘चिनी नागरिक ऑस्ट्रेलियन उत्पादने का खरेदी करायची असा प्रश्न विचारू शकतात. चीनमधून ऑस्ट्रेलियात पर्यटनासाठी जाणारेही वेगळ्या पर्यायाचा विचार करतील’, अशा शब्दात जिंगये यांनी चीनकडून ऑस्ट्रेलियन उत्पादने व पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.
याआधी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सरकारने आपल्या देशावरील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत धाडसी निर्णय घेतले होते. तसेच इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रात सुरु असलेल्या चीनच्या अरेरावीविरोधात ऑस्ट्रेलियाने आक्रमक भूमिका स्वीकारली होती. यामुळे दोन्ही देशांचे संबंध विकोपाला गेले होते. चीनने ऑस्ट्रेलियाला गंभीर परिणामांचा इशाराही दिला होता.
या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने कोरोनाव्हायरसचे मूळ व त्याचा फैलाव याचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी करून चीनवरील दबाव वाढविल्याचे दिसत आहे. त्यानंतर चीनने ऑस्ट्रेलियाला आर्थिक बहिष्काराची धमकी देऊन प्रत्युत्तर दिले. पण ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कठोर शब्दात फटकारत चीनचा दबाव झुगारला. ही बाब ऑस्ट्रेलिया चीनला टक्कर देण्यासाठी तयार असल्याचे अधोरेखित करणारी ठरते.