अमेरिका रशियाविरोधात थेट युद्धाची योजना आखत आहे

अमेरिका रशियाविरोधात थेट युद्धाची योजना आखत आहे

war-on-Russiaमिन्स्क – पोलंडच्या सहाय्याने रशिया व बेलारुसवर हल्ले चढविण्याची योजना अमेरिकेने आखली असल्याचा दावा बेलारुसच्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या प्रमुखांनी केला. नाटोकडून पूर्व युरोपातील लष्करी तैनातीला देण्यात आलेला वेग व क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांची तैनाती या सदर योजनेला दुजोरा देणाऱ्या गोष्टी असल्याचे बेलारुसचे मिलिटरी इंटेलिजन्स चीफ मेजर जनरल रुस्लान कॉसिजिन यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बेलारुसमध्ये रशियन अण्वस्त्रांच्या तैनातीला मान्यता दिल्याचे वृत्त समोर आले होते.

पोलंडसह इतर बाल्टिक देशांच्या भूमीचा वापर हल्ला चढविण्यासाठी करण्यात येईल. या भागातून अमेरिका युरोपात नवा रक्तरंजित संघर्ष सुरू करेल. रशिया व त्याच्या मित्रदेशांना लक्ष्य करण्यात येईल’, असा दावा जनरल रुस्लान कॉसिजिन यांनी केला. पोलंडमधील काही राजकीय नेते पश्चिम युक्रेन तसेच बेलारुसमधील भागांचा पोलंडमध्ये समावेश करण्याबाबत वक्तव्ये करीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

war-Russiaरशिया व बेलारुसविरोधात छेडलेल्या हायब्रिड संघर्षातून विशेष काही हाती लागलेले नाही. त्यामुळेच पाश्चिमात्य देशांनी आता उघड संघर्ष करण्याची तयारी सुरू केली आहे, असेही कॉसिजिन यांनी सांगितले. पोलंड व बाल्टिक देशांविरोधातील संघर्ष रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणेच असेल, असा दावाही त्यांनी पुढे केला.

संघर्ष भडकलाच तर बेलारुस पोलंडमधील भागांवर हल्ले चढवू शकतो, असा इशाराही बेलारुसच्या अधिकाऱ्यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी, युक्रेन बेलारुसला युद्धात खेचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे म्हटले होते. युक्रेनने हे दावे फेटाळले होते. त्याचवेळी बेलारुसचे लष्कर युक्रेनच्या सीमेनजिक तैनाती करीत असून रशियादेखील बेलारुसच्या हद्दीचा वापर करीत असल्याचा आरोप युक्रेनने केला होता.

leave a reply